जिल्हा
ठामपा वृक्ष प्राधिकरणाची झाडाझडती
ठामपा वृक्ष प्राधिकरणाची झाडाझडती
फोटो: ठाणे वैभव
वृक्षछाटणी, स्मशानासाठी लाकडे मोफत द्या-सीताराम राणे
ठाणे : वृक्षतोड आणि वृक्ष पडझडीच्या मुद्यावर सोमवारच्या सर्वसाधारण सभेत भाजप नगरसेवक सिताराम राणे यांनी ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाची चांगलीच झाडाझडती घेतली. तसेच, वृक्ष उपकरातून कोट्यवधीची मिळकत होत असताना वृक्षछाटणी आणि स्मशानासाठी लागणारी लाकडे मोफत का दिली जात नाहीत? असा खडा सवाल भाजप नगरसेवक सिताराम राणे यांनी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांना केला.
ठाणे महापालिकेच्या सोमवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत यंदाच्या पावसाळ्यात वृक्ष पडझडीच्या दुर्घटनांमुळे झालेल्या जीवितहानीवरून जोरदार चर्चा झाली. भाजप नगरसेवक सिताराम राणे यांनी ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाचा लेखाजोखा मांडून प्रशासनाची पोलखोल केली. २०२५-२६ या आर्थिक वर्षात वृक्ष प्राधिकरण विभागाकडे नऊ कोटी ३४ लाख ९८ हजार इतका वृक्ष उपकर जमा झाला. याशिवाय २०२० ते २०२६ या सहा वर्षाच्या कालावधीत तब्बल २२६ कोटी ९४ लाख रुपयांची अनामत रक्कम पालिकेकडे जमा झाली असल्याची माहिती अधिकृत उत्तरातून समोर आली आहे. सिताराम राणे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नानुसार, यावर्षी वृक्षछाटणीसाठी २ कोटी ४५ लाख २१,१८२ रुपयांची तरतूद करण्यात आली असून ६,५०० झाडांची छाटणी करण्यात आली आहे. वृक्षारोपण मोहिमेमुळे अनेक सोसायट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात झाडे लावली गेली. मात्र वेळोवेळी वृक्षांची छाटणी न झाल्यास झाडे धोकादायक बनून इमारतींना आणि नागरिकांना धोका निर्माण होतो. वृक्षतोडीच्या परवानगीस विलंब होत असल्याने पालिकेचे ठेकेदार सोसायट्यांकडून अव्वाच्या सव्वा रक्कम उकळतात. तेव्हा नागरिकांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी गृहनिर्माण संकुलांतील वृक्षछाटणीचे काम महापालिकेने स्वतः करावे, वृक्ष उपकरातून मिळणारे सुमारे ९ कोटी रुपये, अनामत रकमेवरील १५ ते २० कोटी रुपयांचे व्याज, तसेच उपलब्ध निधीचा विचार करता हा खर्च पालिकेसाठी अशक्य नाही. याकडेही राणे यांनी लक्ष वेधले. तसेच दरवर्षी होणाऱ्या तीन दिवसीय वृक्षवल्ली प्रदर्शनासाठी सुमारे ७५ लाखांचा खर्च केला जातो. या प्रदर्शनात अनेक प्रायोजक सहभागी होऊन त्यांची जाहिरात करतात; मात्र त्यांच्याकडून पालिकेला प्रायोजकत्व शुल्क म्हणून छदामही मिळत नाही, अशी कबुली प्रशासनाने दिलेली आहे. ही बाब अयोग्य असल्याकडे राणे यांनी लक्ष वेधले.
वृक्षांची पडझड आणि वृक्षतोडीनंतर निर्माण होणाऱ्या लाकडांविषयी सीताराम राणे यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. वृक्षतोडीनंतर मोठमोठे बुंधे, जाड फांद्या आणि मोठ्या प्रमाणात लाकूड उपलब्ध होत असते. पालिकेच्या उत्तरानुसार ही लाकडे कोपरी येथील हरितकचरा व्यवस्थापन प्रकल्पात जमा केली जातात. हे सर्व केवळ "हरितकचरा" म्हणून दाखवणे योग्य नाही. त्याऐवजी ही लाकडे स्मशानभूमींमध्ये अंत्यसंस्कारासाठी वापरल्यास नागरिकांना मोफत सरण उपलब्ध करून देता येईल. त्यामुळे पालिकेचा खर्चही वाचेल आणि नागरिकांनाही मोठा दिलासा मिळेल. याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याची मागणी सिताराम राणे यांनी महापौरांकडे केली.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600