जिल्हा
ठामपाचा लोगो लावून वाहनातून ३२ कोटींच्या एमडीची वाहतूक
ठामपाचा लोगो लावून वाहनातून ३२ कोटींच्या एमडीची वाहतूक
फोटो: ठाणे वैभव
ठाणे: ठाणे महापालिकेचा लोगो वापरून अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या दुकलीला भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद करून त्यांच्याकडून ३२ कोटी रुपये किमतीचे सुमारे १६ किलो वजनाचे मेफेड्रॉन ( एमडी) जप्त केले आहे. या आरोपीचे राजकीय संबंध असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणी मुंब्र्यातील तन्वीर अहमद कमर अहमद अन्सारी (२३) आणि कोल्हापूरमधील महेश देसाई (३५) या सराईत गुन्हेगारांनाही अटक करण्यात यश आले आहे. त्या दोघांकडून एमडी पावडरसह दोन कार, तीन मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा ३२ कोटी २० लाख १०,१४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यामधील बीएमडब्ल्यू या कारवर ठाणे महापालिकेचे लोगो असल्याने नेमकी ती गाडी राजकीय नेतेमंडळींची किंवा महापालिका अधिकारी वर्गातील कोणाची आहे. याचा शोध सुरू आहे. तसेच या कारवाईत आंतरराष्ट्रीय रॅकेटचा सहभाग असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
पूर्व द्रुतगती महामार्ग नाशिक-ठाणे वाहिनीवरील रांजनोली, भिवंडी बायपासजवळ ९ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास दोन जण एमडी हा अंमलीपदार्थ विक्रीकरीता घेऊन येणार असल्याची माहिती पोलिस शिपाई अमोल इंगळे आणि पोलिस हवालदार प्रशांत राणे यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे भिवंडी गुन्हे शाखा २ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जनार्दन सोनवणे, सहायक पोलिस निरीक्षक श्रीराज माळी, मिथुन भोईर, पोउपनि रविंद्र पाटील पथकाने अचानक नाकांबदी व सापळा रचून दोघांना वाहनांसह ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडती आणि गाडीच्या तपासणीत तन्वीर याच्या गाडीत ११ किलो ७६३ ग्रॅम वजनाचा एमडी तसेच महेश याच्या गाडीत चार किलो १६१ ग्रॅम वजनाचा एमडी हा अंमली पदार्थ मिळून आला. अशाप्रकारे दोघांकडून ३१ कोटी ८४ लाख ८० हजारांचा एकूण १५ किलो ९२४ ग्रॅम एमडीसह ३५ लाखांच्या दोन गाड्या, २२ हजारांचे तीन मोबाईल फोन आणि ८१४० रुपयांची रोकड असा ३२ कोटी २० लाख १०,१४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी त्या दोघांविरोधात भिवंडीमधील कोनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. तसेच त्या दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना बुधवारपर्यंत पोलिस कोठडी मिळाली असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अटकेतील महेश याने ठामपाचा लोगो बीएमडब्ल्यू या गाडीवर लावून तो व्हीआयपी असल्याचा भास निर्माण करत होता. तसेच ती गाडी नेमकी कोणाची आहे, याचा तपास सुरू आहे. तर दुसरी गाडी ही तन्वीर याची असल्याचे समोर आले आहे. मात्र महेश याच्याकडे असलेल्या त्या गाडीवरील लोगोने तपासाला वेगळेच वळण लागल्याचे बोलले जात आहे.
भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जनार्दन सोनवणे, सहायक पोलिस निरीक्षक श्रीराज माळी, मिथुन भोईर, पोलिस उपनिरीक्षक रविंद्र पाटील, राजेश शिंदे, सहायक पोलिस उपनिरीक्षक सुधाकर चौधरी, सुनिल सांकुखे, पोलिस हवालदार सुदेश घाग, प्रकाश पाटील, किशोर थोरात, साबीर शेख, वामन भोईर, प्रशांत राणे, पोलिस शिपाई अमोल इंगळे, भावेश घरत, विजय कुंभार, सर्फराज तडवी, रविंद्र साळुंखे, पोलिस हवालदार माया डोंगरे, दक्षता सुतार, अनुष्का पाटील या पथकाने केली.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600