जिल्हा
गॅस टँकर रिक्षावर पडून दोघे ठार, एक जखमी
गॅस टँकर रिक्षावर पडून दोघे ठार, एक जखमी
फोटो: ठाणे वैभव
ठाणे : घोडबंदर मार्गावरील प्रवास दिवसेंदिवस धोकादायक होत असून आज दुपारी या मार्गांवरील आनंदनगर येथील डी-मार्ट समोर गॅस टँकर थेट रिक्षावर पलटी झाल्याने रिक्षाचा चेंदामेंदा झाला. या भीषण अपघातात रिक्षाचालक आणि एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला, तर एक प्रवासी गंभीर जखमी झाला.
अपघातानंतर टँकरचालक घटनास्थळावरून फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे. दरम्यान या अपघातामुळे काही काळ घोडबंदर रोडवरील वाहतूक ठप्प झाली होती. रिक्षाचालक दशरथ पवार (रा. जयभीमनगर, कळवा) हे दोन प्रवाशांना घेऊन मीरा-भाईंदरच्या दिशेने जात असताना त्याच दिशेने जाणारा गॅस टँकर अचानक नियंत्रण सुटून रिक्षावर पलटी झाला. अवजड टँकरचा संपूर्ण भार रिक्षावर पडल्याने रिक्षाचा चेंदामेंदा झाला. या भीषण अपघातात रिक्षाचालक दशरथ पवार आणि प्रवासी मोहम्मद अमीन (मूळ रा. सरालगंज, उत्तर प्रदेश) यांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या अमजित अन्सारी (मूळ रा. झारखंड) यांना तातडीने ओवळा येथील वेदांत रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
अपघाताची माहिती मिळताच कासारवडवली पोलिस, वाहतूक शाखेचे अधिकारी, अग्निशमन दल आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या सहाय्याने पलटी झालेला टँकर बाजूला करण्यात आला. त्यानंतर रस्त्यावरून अपघातग्रस्त रिक्षा हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
घोडबंदर मार्गावरील नागरिकांना दरदिवशी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून या मार्गांवर दररोज अपघात होत आहेत. अवजड वाहनामुळे या मार्गावरून जाताना नागरिकांना जीव मुठीत धरून जावे लागत असून वाहतूक पोलिसांनी बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांच्या विरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
दरम्यान, अपघातानंतर टँकरचालक घटनास्थळावरून फरार झाला. त्याच्याविरुद्ध कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600