जिल्हा
संस्कृती आर्ट फेस्टिव्हलसाठी उपवन परिसर सजला
संस्कृती आर्ट फेस्टिव्हलसाठी उपवन परिसर सजला
फोटो: ठाणे वैभव
आजपासून रंगणार महोत्सव
ठाणे: ठाणेकरांसाठी बहुप्रतिक्षित असा संस्कृती आर्ट फेस्टिव्हल ६ ते ९ फेब्रुवारी दरम्यान उपवन तलाव येथे होत आहे. यंदाचा फेस्टिव्हल 'कला संगमाची विठ्ठलवारी' या संकल्पनेवर आधारित असल्याची माहिती कार्यक्रमाचे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
६ फेब्रुवारी रोजी ह्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या उत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत
६ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित आनंद भाटे यांच्या सुरेल स्वरांनी संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उद्घाटन सोहळा रंगणार आहे. ७ फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ गायक आनंद शिंदे आणि आदर्श शिंदे ही पिता-पुत्राची जोडी शिंदेशाही या कार्यक्रमातून रसिकांची मन जिंकतील. ८ फेब्रुवारी रोजी बॉलीवूडचे सुप्रसिद्ध गायक शान यांच्या सुमधुर आवाजाने सुरेल संध्या रंगेल. ९ फेब्रुवारी रोजी तारक मेहता फेम कवी व अभिनेते शैलेश लोढा यांची काव्य मैफल रंगणार आहे.
याचबरोबर ज्येष्ठ कथ्थक नृत्यांगना मंजिरी देव, ज्येष्ठ अभिनेत्री सुधा चंद्रन, ओडिसी नृत्यांगना सुजाता मोहपात्रा, भरतनाट्यम् कलाकार दीपक मुजुमदार अशा दिग्गजांचे सादरीकरण होणार आहे. तसेच लोकनृत्य, शास्त्रीय नृत्य, सुफी संगीत, भारूड, पोवाडा, अभंग आदींचा सुंदर मिलाफ फेस्टिव्हलमध्ये रसिकांना अनुभवता येणार आहे. याचबरोबर विविध कार्यशाळा, धाडसी खेळांचे प्रात्यक्षिक, चित्रप्रदर्शनाचाही समावेश आहे. ठाणेकरांनी संस्कृती आर्ट फेस्टिव्हलमध्ये सहभागी होऊन विविध कलांचा मनमुराद आनंद घ्यावा, असे आवाहन श्री. सरनाईक यांनी केले आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600