जिल्हा

वागळेच्या चकचकीत आयटी दुनियेला फेरीवाले-पार्किंगचा वेढा

वागळेच्या चकचकीत आयटी दुनियेला फेरीवाले-पार्किंगचा वेढा
वागळेच्या चकचकीत आयटी दुनियेला फेरीवाले-पार्किंगचा वेढा फोटो: ठाणे वैभव
औद्योगिक संघटनांचे ठामपा आणि वाहतूक शाखेपुढे गाऱ्हाणे ठाणे : एकीकडे राज्य सरकार उद्योगवाढीसाठी उद्योजकांसाठी पायघड्या घालत असताना दुसरीकडे मात्र ठाणे जिल्ह्यातील उद्योजकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. तर वागळे औद्योगिक वसाहतीचीही चारही बाजूने अनधिकृत बेकायदेशीर व्यवसायांनी कोंडी होत आहे. वाढत्या आयटी पार्कमुळे वाढलेले बेकायदा खाद्य पदार्थांचे स्टॉल, अतिक्रमण, दुतर्फा अनधिकृत पार्किंग आणि त्यामुळे होणार्‍या वाहतूक कोंडीने येथील कारखानदार, उद्योजक हैराण झाले आहेत. याचा परिणाम मालाच्या आवक-जावकवर होत असून ही परिस्थिती अशीच कायम राहिली तर येथील उद्योगांसमोर स्थलांतरणाशिवाय पर्याय राहणार नसल्याचा इशारा स्मॉल स्केल इंडस्ट्रीने दिला आहे. ठाण्याची ओळख पूर्वी औद्योगिक जिल्हा म्हणून होती. त्यात ठाणे शहरातील वागळे औद्योगिक वसाहत ही सर्वात मोठी मानली जात होती. आता या औद्योगिक वसाहतीमधील निम्म्याहून अधिक कारखाने बंद किंवा स्थलांतरीत झाले आहेत. त्या जागेवर ९० हून अधिक आय टी पार्क उभे राहिले आहेत. अशा परिस्थितीत येथील उर्वरित उद्योग आपले अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड करत आहेत. पण त्यातही त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यामध्ये प्रामुख्याने वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणाची समस्या गंभीर आहे. यावर चर्चा करण्यासाठी दोन दिवसांपूर्वी वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज शिरसाठ आणि ठाणे पालिका अधिकार्‍यांसोबत एक बैठक झाली. यावेळी उपस्थित स्मॉल स्केल इंडस्ट्रीज म्हणजेच टीसाचे अध्यक्ष भावेश मारु यांनी उद्योजकांना भेडसावणार्‍या समस्यांचा पाढा वाचला. वागळे इस्टेट परिसरात दिवसेंदिवस वाहनांचा ताण वाढत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांच्या कडेला वर्षानुवर्षे टाकलेल्या भंगार गाड्यांची संख्या वाढत आहे. रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग, आणि आयटी पार्क परिसरातील अनियंत्रित वाहनतळामुळे रस्ते कायम कोंडीत सापडत असल्याचे ते म्हणाले. या आयटी पार्कच्या कर्मचार्‍यांची भूक भागवण्यासाठी गेल्या काही वर्षांमध्ये रस्त्यांवर खाद्य पदार्थांच्या गाड्यांची संख्याही वाढली आहे. त्यातून रस्त्याच्या कडेलाच कचरा निर्माण होत आहे. एकीकडे अडवलेले रस्ते तर दुसरीकडे चालण्यासाठी पदपथही गायब झाले आहेत. कारखान्यांच्या गेटसमोर गाड्या लावून ठेवणे, ट्रक आणि डंपर रस्त्यावर उभे करणे ही रोजचीच परिस्थिती झाली आहे. त्यामुळे माल घेऊन येणारे आणि घेऊन जाणारे ट्रक, कंटेनर कोंडीत अडकत आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी आता याकडे गांभीर्याने पाहावे,’ अशी मागणी अनेक उद्योग प्रतिनिधींनी यावेळी केली. ठाणे महापालिकेने येथील रस्त्यांचे रुंदीकरण केले आहे. मात्र त्यामुळे कोंडी दूर होण्याऐवजी याचे लाभार्थी अतिक्रमण करणारे झाले आहेत, अशी खंत टीसाच्या माजी अध्यक्षा सुजाता सोपारकर यांनी व्यक्त केली. वागळे इस्टेट परिसरात पी १, पी २ पार्किंग प्रणाली राबवली जाणार आहे. ज्यामुळे वाहनांच्या थांब्यांचे नियोजन सुकर होईल. काही रस्त्यांवर एकेरी वाहतूक व्यवस्था लागू करण्याचा अभ्यास केला जाईल. वागळे औद्योगिक क्षेत्रात चार वाहतूक पोलीस कायमस्वरूपी तैनात केले जातील. टीसाकडून चार स्वयंसेवक दिल्यास संयुक्त वाहतूक पथक तयार करण्यात येईल. पुढील ४५ दिवसांत कारखान्यांच्या गेटसमोर पार्किंगवर कठोर कारवाई करण्यात येईल. हातगाडीवाले आणि खाद्यपदार्थांच्या गाड्या हटवून त्यांना नियोजित ठिकाणी हलविण्याचे आश्वासन यावेळी ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे अधिकारी हेमंत गोहिल यांनी दिली.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600