जिल्हा

कळवा पूर्वेत गुन्हेगारीचा अस्त कधी होणार?

पूर्व-पश्चिमेसाठी स्वतंत्र पोलिस ठाण्याची मागणी ठाणे: वाढत्या नागरीकरणामुळे बेकायदा पार्कींग, फेरीवाले, वाहतूक कोंडी या समस्यांबरोबरच कळवा पूर्व आणि पश्चिमेत गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. मात्र या भागांसाठी एकच पोलिस ठाणे असल्याने पोलिस प्रशासनावर ताण पडत आहे. परिणामी कायदा सुव्यवस्था राखताना पोलिसांची कसरत होत आहे. त्यामुळे कळवा पूर्व आणि पश्चिमेला स्वतंत्र पोलिस ठाणे देऊन गस्त वाढवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. कळवा शहराचा विकास झपाट्याने होत आहे, तसेच येथील वाढती झोपडपट्टी हा कळीचा मुद्दा ठरत आहे. पाणी, वीजेची समस्या दैनंदिन झाली आहे. पण आता हे शहर येथील रहिवाशांना असुरक्षित भासू लागले आहे. यासंदर्भात अपर्णाराज सहकारी गृहनिर्माण सोसायटीने पुढाकार घेतला असून थेट पोलिस आयुक्तांनाच साकडे घातले आहे. कळव्यात घरफोडी, चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दिवसाढवळया चेन हिसकावण्याचे प्रकार वाढल्यामुळे कमालीची असुरक्षितता वाढली आहे. विशेषत: महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. येथील अनेक झोपडपट्टी परिसरात आणि मोक्याच्या ठिकाणी खुलेआम अवैध दारुचे अड्डे चालवले जात आहेत. अंमली पदार्थांची तस्करीही वाढली असल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे पोलिस आयुक्तांना दिलेल्या पत्रात लिहिले आहे. एकीकडे गुन्हेगारी वाढत आहे तर दुसरीकडे वाहतूक कोंडी आणि फेरीवाल्यांचा जाच वाढल्याची समस्याही मांडण्यात आली आहे. रस्त्यावर बेकायदेशीर पार्किंग व फेरीवाल्यांमुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होतात. आपत्कालीन वाहनांना जाण्यात अडचण येते. त्यात रिक्षाचालकांची मनमानी वाढल्यामुळे त्रासात भर पडली आहे. पूर्वी कळवा पूर्व येथे पोलिस चौकी होती. त्याचे स्थलांतरण झाल्यामुळे कायद्याचा धाक कमी झाला आहे. त्यामुळे कळवा पूर्व आणि पश्चिम येथे स्वतंत्र पोलिस चौकी देत सीसीटीव्ही आणि गस्त वाढवण्याची मागणीही करण्यात आली आहे. वर्षाला १२०० गुन्ह्यांची नोंद २०११ च्या जनगणनेनुसार कळव्याची लोकसंख्या १६,२८९ इतकी आहे. पण आता ही लोकसंख्या अडीच लाखांच्या पुढे सरकली आहे. एकीकडे टोलेजंग इमारती तर दुसरीकडे झोडपट्ट्या असा पसारा या उपशहराचा आहे. येथील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी कळवा पोलिस ठाण्यावर आहे. पश्चिम भागात असलेल्या या पोलिस ठाण्यात सुमारे १२५ अधिकारी कर्मचारी आपले कर्तव्य बजावत आहेत. हाती असलेल्या पोलिस बळाची कुमक समाधानकारक असल्याचे सांगण्यात येते. पण कळवा पोलिस ठाण्यात दाखल होणार्‍या गुन्ह्यांचा अंदाज घेतला असता वर्षाला १२०० ते १५०० इतकी नोंद होत आहे. म्हणजे महिन्याला सरासरी शंभर गुन्ह्यांची नोंद होत आहे. यामध्ये चोरी, घरफोडीपासून ते हत्यांपर्यंच्या गुन्ह्यांचा समावेश असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे. रिक्षाची डोकेदुखी कायम कळव्यातील घोलाईनगरमध्ये रिक्षाचालकांनी असहकार पुकारला आहे. येथील अनधिकृत बाजारामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. त्यामुळे पूर्ण भाडे घेउनकही अनेकवेळा प्रवाशांना अर्ध्या रस्त्यातच उतरवे लागत आहे. या विरोधात येथील शेअरींग रिक्षाचालकांनी बंद पुकारला होता. पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे सेवा पुन्हा सुरू झाली. मात्र कोंडीमुळे एका फेरीसाठी तासाभराचा वेळ लागत असल्यामुळे डोकेदुखी वाढली आहे. यासंदर्भात कळवा पारसिक प्रवासी संघटना आणि स्थानिक ससोसायट्यांनी प्रशासनासोबत वारंवार पाठपुरावा केला. पण कोणतीच दाद मिळत असल्याने कळवावासिय आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याची माहिती संघटनेचे पदाधिकारी सिद्धेश देसाई यांनी दिली.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600