जिल्हा
निवडणुकांचा ज्वर लागला चढू; इच्छुकांच्या मुलाखती सुरू
निवडणुकांचा ज्वर लागला चढू; इच्छुकांच्या मुलाखती सुरू
फोटो: ठाणे वैभव
ठाण्यात काँग्रेसने घेतली आघाडी
ठाणे : अगामी ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत महायुती आणि काँग्रेस आघाडी यांच्यात युती किंवा आघाडीबाबत साशंकता असताना काँग्रेसने मात्र ठाण्यात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचा कार्यक्रम लावून बाजी मारली आहे.
ठाणे हा पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता, परंतु मागिल काही वर्षात काँग्रेसला उतरती कळा लागली असून २०१७ला त्यांचे अवघे तीन नगरसेवक निवडून आले होते. यावेळी काँग्रेसने जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी आत्तापासूनच कंबर कसली आहे. ठाणे शहर अध्यक्ष ॲड. विक्रांत चव्हाण सतत आंदोलन करून काँग्रेसचे काम ठाणेकरांसमोर आणत आहेत. काँग्रेसच्या उमेदवारांना मतदारांसमोर पोहचण्यासाठी जास्त वेळ मिळावा यासाठी काँग्रेसने १२ऑक्टोबरपासून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
उमेदवाराने मतदार यादीतील नावाप्रमाणे अर्ज भरावा तसेच निवडणुकीत लागणाऱ्या कागदपत्राप्रमाणेच मुलाखतीकरिता येताना कागदपत्रे आणावीत, या उमेदवारांची कागदपत्रे तपासून त्रुटी तसेच मार्गदर्शन करण्यासाठी आठ शिक्षित सदस्यांची एक कमिटी तयार केली असल्याची माहिती ठाणे शहर काँग्रेसचे सरचिटणीस महेंद्र म्हात्रे यांनी दिली आहे.
मागिल अनेक वर्षांपासून अंतर्गत गटबाजी असलेल्या ठाणे शहर काँग्रेस पक्षात सध्यातरी एकोपा दिसत आहे. महाविकास आघाडी झाल्यास अनेक प्रभागांत गटबाजी होण्याची शक्यता आहे. ज्या उमेदवाराकडे निवडून येण्याची क्षमता असेल अशाच उमेदवाराला उमेदवारी द्यावी, अशी मागणी काँग्रेसमधील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने दिली आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600