महाराष्ट्र
गोविंदाच्या सहभागाने महायुतीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणीत
ठाणे: ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या निवडणूक प्रचारासाठी सिने अभिनेते गोविंदा हे मंगळवारी सायंकाळी प्रचार फेरीत सहभागी झाले. प्रचार गीतावर थिरकणारी तरुणाई आणि गोविंदा यांची उपस्थिती यामुळे एक वेगळाच उत्साह प्रचार फेरीत पहायला मिळाला. कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणीत झाला होता.
ठाणे शहर विधानसभा क्षेत्र अंतर्गत घोडबंदर रोड येथील डोंगरी पाडा येथून प्रचार फेरीला प्रारंभ झाला. यावेळी शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, रिपाइं व मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. संपूर्ण परिसर भगवामय झाला होता. मोटारसायकलस्वार मोठ्या संख्येने प्रचार फेरीत सहभागी झाले होते.
आयुक्त बंगला, हिरानंदानी मेडोज, ब्रम्हांड सर्कल, ढोकाळी शाखेपर्यंत प्रचार फेरी आल्यानंतर गोविंदा या प्रचार फेरीत सहभागी झाले. ढोल-ताशाच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत गोविंदा यांचे स्वागत करण्यात आले. महिला भगिनींनी गोविंदा आणि नरेश म्हस्के यांचे औक्षण केले.
मनोरमानगर, दुर्गा चौक, मानपाडा प्रभाग कार्यालय, पेट्रोल पंप येथे फिरून माजिवडा गाव येथे प्रचार फेरीचा समारोप झाला. नाक्यानाक्यावर, चौकाचौकात पुष्पगुच्छ देऊन गोविंदा आणि नरेश म्हस्के यांचे स्वागत करण्यात आले.
प्रचार फेरीत विकास रथावर भाजप ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले, जेष्ठ माजी नगरसेवक देवराम भोईर, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर, माजी नगरसेवक भूषण भोईर, माजी नगरसेवक मनोहर डुंबरे, माजी नगरसेविका अर्चना मणेरा, माजी नगरसेविका कविता पाटील, किरण मणेरा, अर्चना पाटील, निशा पाटील, रवी पाटील, प्रवीण नागरे आदी मान्यवर सहभागी झाले होते.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600