जिल्हा
कोलशेत भागात गोदामाला भीषण आग
कोलशेत भागात गोदामाला भीषण आग
फोटो: ठाणे वैभव
ठाणे: कोलशेत येथील तरीचा पाडा परिसरात पुठ्ठ्याच्या गोदाम आणि एका वाहन दुरुस्ती दुकानाला भीषण आग लागल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या आगीनंतर कोलशेत भागात धुराचे आणि आगीचे लोट निर्माण झाले होते. अद्याप कोणीही जखमी नसल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.
कोलशेत भागात मोठ्या प्रमाणात गृहसंकुले उभारली जात आहे. त्याप्रमाणेच, या भागातील काही ठिकाणी अनधिकृत गोदामांची संख्या देखील वाढत आहे. मंगळवारी सकाळी ७.४० वाजताच्या सुमारास कोलशेत येथील तरीचा पाडा परिसरात पुठ्ठ्याचे गोदाम आणि वाहन दुरुस्तीच्या दुकानाला भीषण आग लागली. गोदामामध्ये पुठ्ठे असल्याने अवघ्या काही क्षणात आगीने रौद्ररुप धारण केले. धुराचे लोट हवेत पसरल्याने प्रदूषण देखील वाढले. घटनेची माहिती ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाला येथील नागरिकांनी दिल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान आणि अग्निरोधक वाहने घटनास्थळी दाखल झाली.
आग पसरत असल्याने आगीवर नियंत्रण मिळविताना जवानांना अडचणी येत होत्या. सकाळी ९.३० नंतरही आगीवर नियंत्रण मिळविणे शक्य झाले नाही. या घटनेत कोणीही जखमी नसल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600