जिल्हा
ठाणे ग्रामीण पोलीस दलात स्वतंत्र वाहतुक शाखा
ठाणे ग्रामीण पोलीस दलात स्वतंत्र वाहतुक शाखा
फोटो: ठाणे वैभव
अपघात रोखण्यासाठी उपाययोजना
ठाणे: ठाणे ग्रामीण क्षेत्रातील वाहतुकीला शिस्त लागावी, अपघात रोखले जावे यासाठी ठाणे ग्रामीण पोलीस दलात स्वतंत्र वाहतूक शाखा सुरु करण्यात आली आहे. पूर्वी वाहतूक शाखेचे कामकाज संबंधित पोलीस ठाण्यात पाहिले जात होते. त्यामुळे पोलीस ठाण्यावर वाहतूक नियंत्रण, कारवाई आणि उपाययोजनांचा भार पडत होता.
आता वाहतूक पोलिसांचा स्वतंत्र विभाग झाल्याने अपघातांवर आणि वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळण्याची शक्यता आहे. मुरबाड येथील कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर झालेल्या भीषण अपघातांनंतर स्वतंत्र विभागासाठी ग्रामीण पोलीस दलाच्या हालचाली वाढल्या होत्या. अखेर विभाग स्वतंत्र झाला असून ४५ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची यात नियुक्ती करण्यात आल्याचे ठाणे ग्रामीण पोलिसांनी स्पष्ट केले.
ठाणे ग्रामीण क्षेत्रातील भिवंडी ग्रामीण क्षेत्र, कसारा, मुरबाड, शहापूर, कल्याण ग्रामीण यांसारख्या भागात ठाणे ग्रामीण पोलीस विभागाची हद्द आहे. ग्रामीण पोलीस दलाच्या क्षेत्रामध्ये भिवंडी तालुका, गणेशपुरी, कल्याण तालुका, कसारा, किन्हवली, कुळगाव, मुरबाड, पडघा, शहापूर, टोकावडे आणि वासिंद अशी ११ पोलीस ठाणी येतात. या क्षेत्रात सध्या सार्वजनिक वाहतुकीसाठी पुरेशी यंत्रणा नाही. त्यामुळे नागरिक काळी-पिवळी रिक्षा, जीप या सारख्या प्रवासी वाहनांतून तालुक्याचे स्थानक गाठतात. या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांना बसविले जाते.
ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतून मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला जोडणारे रस्ते, मुंबई नाशिक महामार्ग, कल्याण अहिल्यानगर महामार्गासह अनेक महत्त्वाचे मार्ग जातात. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाईचे प्रमाण कमी असल्याने अनेकदा किरकोळ किंवा गंभीर अपघाताचे प्रमाण या क्षेत्रात वाढले आहे. एप्रिल महिन्यात कल्याण -मुरबाड महामार्गावरील रायते पुलावर प्रवासी इको व्हॅन आणि सिमेंट मिक्सर या वाहनांमध्ये झालेल्या भीषण अपघातात ११ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तर मे महिन्यात याच महामार्गावरील वैशाखरे या भागात एसटी महामंडळ आणि एका वाहनाच्या धडकेमुळे झालेल्या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला होता.
या अपघातांनंतर येथील वाहतूक नियमांच्या उल्लंघनाविषयी अनेक प्रश्न निर्माण झाले होते. ठाणे ग्रामीण क्षेत्रात ठाणे शहर आयुक्तालयाप्रमाणे स्वतंत्र वाहतूक नियंत्रण शाखा नव्हती. त्यामुळे वाहतूकीचे नियंत्रण करण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनाच कामे करावी लागत होती. पोलीस ठाण्यातील कामकाज आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई अशी दोन्ही कामे करावी लागत असल्याने कामावरही त्याचा परिणाम होत होता. अखेर ठाणे ग्रामीण पोलीस दलात स्वतंत्र वाहतूक शाखेची निर्मिती करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600