जिल्हा
राज ठाकरेंसह सहाजणांची निर्दोष मुक्तता
राज ठाकरेंसह सहाजणांची निर्दोष मुक्तता
फोटो: ठाणे वैभव
कल्याण रेल्वे स्टेशन मारहाण प्रकरण
ठाणे: कल्याण रेल्वे स्थानकावर १८ वर्षांपूर्वी रेल्वे भरती परीक्षेसाठी आलेल्या उमेदवारांना मारहाण केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह सहाजणांची ठाणे न्यायालयाने गुरुवारी निर्दोष मुक्तता केली.
ठाणे जिल्हा मुख्य न्यायाधीश ए. व्ही. कुलकर्णी यांनी हा निकाल दिला. यामुळे राज ठाकरे यांच्यासह सहाजणांना दिलासा मिळला आहे.
रेल्वेची नोकर भरती परीक्षा २००८मध्ये झाली. या परिक्षेसाठी कल्याण रेल्वे स्थानकात राज्याबाहेरून उमेदवार आले होते. या उमदेवारांना मारहाण झाल्याची घटना घडली होती. त्या काळात मनसेकडून परप्रांतीयांविरोधात आक्रमक भूमिका घेतली जात होती. तसेच रेल्वे भरती प्रक्रियेत बिहारी तरुणांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोपही करण्यात आला होता. त्यामुळे या मारहाणीच्या घटनेनंतर राज ठाकरे यांच्यासह मनसेच्या आठ कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यातील दोन जणांचा गेल्या काही वर्षात मृत्यु झाला. त्यामुळे राज ठाकरे यांच्यासह सहाजणांविरोधात सुरूवातीला कल्याण न्यायालयात सुनावणी सुरू होती. नंतर हे प्रकरण ठाणे न्यायालयात वर्ग करण्यात आले.
६ मे झालेल्या सुनावणीत राज ठाकरे यांच्यासह सहाजण न्यायालयात हजर झाले होते. राज ठाकरे ठाण्यात येणार असल्याने न्यायालय परिसरात मनसे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. सुनावणीदरम्यान राज ठाकरे यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावत हे प्रकरण बनावट असल्याचा दावा केला होता. त्यांची बाजू वकील शैलेश सडेकर, शुभम कानडे आणि सह्याजी शिंदे यांनी न्यायालयात मांडली होती. तर सरकारी पक्षाकडून वकील प्रमिला चव्हाण यांनी युक्तिवाद केला. गुरुवारी पुन्हा झालेल्या सुनावणीत मुख्य न्यायिक दंडाधिकारी ए. व्ही. कुलकर्णी यांनी पुराव्याअभावी तसेच बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत राज ठाकरे यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600