वसई न्यायालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धाड
वसई: वसई न्यायालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी दुपारी एक मोठी कारवाई केली. न्यायालयात दाखल असलेल्या एका प्रकरणातील मालमत्ता परत मिळवण्याच्या अर्जावर अनुकूल म्हणणे मांडण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना विशेष सहाय्यक सरकारी वकिलाला रंगेहात अटक करण्यात आली आहे.
भुपेश पुरंदरे (४७) असे अटक करण्यात आलेल्या विशेष सहाय्यक सरकारी वकिलाचे नाव असून, ते वसई येथील सह दिवाणी (उच्चस्तर) न्यायालयात कार्यरत आहेत.
तक्रारदाराने वसई येथील न्यायालयात जप्त केलेली मालमत्ता परत मिळवण्यासाठी एक अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सरकारी पक्षाच्या वतीने अनुकूल म्हणणे किंवा शेरा सादर करण्यासाठी विशेष सहाय्यक सरकारी वकील भुपेश पुरंदरे यांनी तक्रारदाराकडे २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र, तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी थेट ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथे २० मे २०२६ रोजी रीतसर तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता, पुरंदरे यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले होते.
त्याच अनुषंगाने गुरुवार २१ मे रोजी दुपारच्या सुमारास एसीबीने वसई न्यायालय परिसरात सापळा रचला. दुपारी साडेबारा वाजता, वसई न्यायालयाच्या तळमजल्यावरील सरकारी वकील यांच्या शासकीय कक्षातच आरोपी भुपेश पुरंदरे यांनी तक्रारदाराकडून २५ हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारली. पैसे स्वीकारताच दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने झडप घालून पुरंदरे यांना लाचेच्या रक्कमेसह रंगेहात ताब्यात घेतले.
या प्रकरणी वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
ही कारवाई ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सुहास शिंदे आणि भागवत सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या पोलीस उपअधीक्षक रुपाली पोळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे. न्यायालयाच्या आवारातच शासकीय वकिलाला लाच घेताना पकडल्याने कायदे वर्तुळात आणि न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली आहे.