जिल्हा

भातसा धरणाचे पाचही दरवाजे उघडले

भातसा धरणाचे पाचही दरवाजे उघडले
भातसा धरणाचे पाचही दरवाजे उघडले फोटो: ठाणे वैभव

मुसळधार पावसामुळे विसर्गात वाढ

* नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

शहापूर: भातसा धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत असल्याने जलाशयाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी भातसा धरणाचे पाचही वक्रद्वार रविवार २६ जुलै रोजी रात्री ८ वाजता ०.२५ मीटरवरून वाढवून ०.५० मीटरने उघडण्यात आले. या निर्णयामुळे भातसा नदीतील पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता असून नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

काल संध्याकाळी ५.४५ वाजता धरणाची पाणीपातळी १३८.३७ मीटर इतकी नोंदविण्यात आली होती. जलग्रहण व लाभक्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरणात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह सातत्याने वाढत असल्याने जलाशय परिचालन सूचीनुसार हा निर्णय घेण्यात आला.दरवाजे उघडल्यानंतर भातसा नदीपात्रात १९१.३५ घनमीटर प्रति सेकंद सुमारे ६,७५७.५२५ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला. या पार्श्वभूमीवर शहापूर, भिवंडी आणि कल्याण येथील तहसीलदारांना सतर्कतेच्या सूचना दिल्या होत्या. विशेषतः शहापूर-मुरबाड मार्गावरील सापगाव पूल, तसेच भातसा नदीकाठावरील गावांचे सरपंच, तलाठी, ग्रामसेवक आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना नदीच्या पाणीपातळीत होणाऱ्या वाढीबाबत तातडीने नागरिकांना सतर्क करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

भातसा धरणाचे गेट ०.५० सें.मी.ने उघडले तर विसर्ग नगण्य असतो आणि सहसा गावे बाधित होत नाहीत.विसर्ग ०.५० मीटर किंवा त्यापेक्षा जास्त झाल्यावरच नदीकाठच्या सखल गाव-पाड्यांना धोक्याचा इशारा दिला जातो. दरम्यान १९ ऑगस्ट २०२५ रोजी भातसा धरणाची पाचही वक्रद्वारे प्रथम ०.५० मीटरने उघडण्यात आली होती. त्यानंतर पाण्याची पातळी वाढल्याने ती ०.७५ मीटरपर्यंत वाढवून विसर्गात वाढ करण्यात आली होती. त्यावेळीही पाटबंधारे विभागाने भातसा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला होता.

दरवर्षी विसर्गाच्या प्रमाणानुसार सतर्कतेची यादी बदलत असली तरी गोठेघर, वाफे, शहापूर, आसनगाव, कळंभे, बोरशेती यांसह भातसा नदीकाठची अनेक गावे आणि सखल भागातील गाव-पाड्यांना प्रशासन सतर्क राहण्याचा इशारा देते. तथापी धरणाची वक्रद्वारे ०.५० मीटरपर्यंत उघडल्यास बहुतांश वेळा विसर्ग नियंत्रित स्वरूपाचा असतो. मात्र सततचा पाऊस, धरणात येणाऱ्या पाण्याचा वाढता प्रवाह आणि पुढील विसर्गवाढ यानुसार नदीकाठच्या सखल भागांमध्ये परिस्थिती बदलू शकते.त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600