जिल्हा

वर्दळीचा तीन हात नाका वाहतूक कोंडीमुक्त होणार

वर्दळीचा तीन हात नाका वाहतूक कोंडीमुक्त होणार
वर्दळीचा तीन हात नाका वाहतूक कोंडीमुक्त होणार फोटो: ठाणे वैभव
अत्याधुनिक वाहतूक सुधारणा प्रकल्पाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन
ठाणे: आशिया खंडातील सर्वाधिक वर्दळीच्या आणि वाहतूक कोंडीसाठी ओळखल्या जाणाऱ्या तीन हात नाका चौकाच्या कायमस्वरूपी विकासासाठी उभारण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी तीन हात नाका वाहतूक सुधारणा प्रकल्पाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री तथा माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
ठाणेकरांच्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम देणारा हा प्रकल्प शहराच्या वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा देणारा ठरणार असून, शहरातील सर्वात मोठ्या आणि अत्याधुनिक वाहतूक सुधारणा प्रकल्पांपैकी एक म्हणून त्याची ओळख निर्माण होत आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकासकामांचे उद्घाटन, लोकार्पण आणि भूमिपूजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. यामध्ये इंदिरानगर-रूपादेवीपाडा जलपुरवठा प्रकल्प, विविध रस्ते व पायाभूत सुविधा तसेच यशवंत रामा आंतरराष्ट्रीय तरण तलाव आणि क्रीडा संकुलाच्या भूमिपूजनाचा समावेश होता.
यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री असताना मंजूर केलेला हा सुमारे २०० कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आता प्रत्यक्षात साकार होत आहे. अत्यंत गुंतागुंतीच्या अभियांत्रिकी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पामुळे तीन हात नाक्यावरील वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार असून, सध्या अस्तित्वात असलेल्या सात प्रमुख वाहतूक प्रवाहांपैकी चार प्रवाह सिग्नलमुक्त आणि सुरळीत होतील. त्यामुळे लाखो वाहनचालकांचा वेळ, इंधन आणि श्रम वाचणार आहेत. तीन हात नाका हा आशिया खंडातील सर्वाधिक गजबजलेला वाहतूक चौक मानला जातो. या चौकावरील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी कमी करण्यासाठी अनेक वर्षांपासून उपाययोजनांची अपेक्षा होती. मात्र, अशक्यप्राय वाटणाऱ्या या प्रकल्पाला एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारामुळे मंजुरी मिळाली आणि आता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली आहे. पुढील दीड वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्यानंतर ठाण्याच्या वाहतुकीत आमूलाग्र बदल अनुभवायला मिळणार आहे."विकास हीच आमची ओळख आहे. ठाणेकरांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी आम्ही सातत्याने काम करत आहोत. 'ठाणे बदलतंय' ही केवळ घोषणा नसून ती प्रत्यक्षात उतरविण्याचे काम सुरू आहे," असेही शिंदे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बोलताना विकास हा घोषणांचा नव्हे तर प्रत्यक्ष कृतीचा विषय असल्याचे अधोरेखित करत, "भूमिपूजन किंवा उद्घाटनासाठी विकासकामे थांबवू नका; सर्व प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करा," अशा स्पष्ट सूचना त्यांनी एमएमआरडीएचे अधिकारी आणि संबंधित ठेकेदारांना दिल्या. विकासकामांमध्ये कधीही राजकारण केले नाही आणि पुढेही करणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही देत ठाण्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
ठाण्यात सुरू असलेल्या विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांमुळे ठाणेकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार आहे. मुंबई, ठाणे, नाशिक आणि परिसरातील शहरांदरम्यानचा प्रवास अधिक जलद आणि सुलभ होणार आहे. हा प्रकल्प खऱ्या अर्थाने 'गेम चेंजर' ठरतील, असा विश्वास श्री.शिंदे यांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600