जिल्हा
बदलापूर रेल्वे स्थानकाला टर्मिनसचा दर्जा मिळणार
बदलापूर रेल्वे स्थानकाला टर्मिनसचा दर्जा मिळणार
फोटो: ठाणे वैभव
* प्रस्तावाला गती मिळणार
* माजी नगराध्यक्ष राम पातकर यांची माहिती
बदलापूर: बदलापूर रेल्वे स्थानकाला टर्मिनसचा दर्जा देण्याच्या कामाला गती मिळाली असून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत सकारात्मकता दर्शवली असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष रामभाऊ पातकर यांनी दिली.
बदलापूर आणि परिसरातील रेल्वे प्रवाशांच्या वाढत्या समस्या व सुविधांबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत नवी दिल्ली येथे महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच झाली. या बैठकीस पालघरचे खासदार हेमंत सावरा तसेच माजी नगराध्यक्ष पातकर उपस्थित होते. बदलापूर शहरातील वाढती प्रवासी संख्या, रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेचे प्रश्न तसेच विविध मूलभूत रेल्वे सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यात प्रामुख्याने बदलापूर रेल्वे स्थानकाला ‘टर्मिनस’चा दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव मांडण्यात आला. या प्रस्तावास रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित अधिकाऱ्यांना यासंदर्भात सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
तसेच बदलापूर-वांगणी दरम्यान चामटोली (कासगाव) येथे नवीन रेल्वे स्टेशन उभारणे, कासगाव-कामोठे नवीन रेल्वे मार्ग टाकण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. या प्रस्तावावर रेल्वे मंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेत या प्रकल्पाचा सविस्तर डीपीआर अहवाल तयार करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. याशिवाय डीआरएमना प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.
बदलापूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याबाबत अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे आदेश देखील रेल्वेमंत्र्यांनी दिले. बदलापूर रेल्वे स्थानकावरील वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता प्लॅटफॉर्मची लांबी वाढविण्याबाबतही चर्चा झाली. प्लॅटफॉर्मची लांबी वाढवल्यानंतर बदलापूर स्थानकावर एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली.
बदलापूर येथून धावणाऱ्या अनेक लोकल व इतर गाड्या नेहमी उशिरा धावत असल्याची बाब निदर्शनास आणून देण्यात आली. याची गंभीर दखल घेत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी संबंधित विभागाला रेल्वे गाड्या वेळेवर धावण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. बदलापूर व परिसरातील रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षितता व सोयीसुविधांच्या दृष्टीने विविध मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली. मांडलेल्या बहुतांश मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन रेल्वे मंत्र्यांनी दिले.
माजी नगराध्यक्ष पातकर यांनी रेल्वे सुविधांबाबत अभ्यासपूर्वक तयार केलेले विविध प्रस्ताव तसंच प्रस्तावांचे सविस्तर सादरीकरण पाहून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पातकर यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीचे कौतुक केले तसेच संबंधित विभागाला या प्रस्तावांवर सकारात्मक दृष्टीकोनातून कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
यावेळी बोलताना श्री. रामभाऊ पातकर यांनी सांगितले की,
“बदलापूर शहरातील लाखो रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहोत. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या समवेत झालेल्या बैठकीमुळे अनेक महत्त्वाच्या मागण्यांना गती मिळणार असून भविष्यात बदलापूर परिसरातील रेल्वे सुविधांमध्ये मोठी सुधारणा होईल, असा विश्वास रामभाऊ पातकर यांनी व्यक्त केला. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची महत्त्वपूर्ण भेट घडवून आणण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल पालघरचे खासदार डॉ. हेमंत सावरा यांचे पातकर यांनी आभार मानले.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600