जिल्हा

पूर्व-पश्चिमेकडील दोन्ही स्कायवॉक निष्कासित होणार

पूर्व-पश्चिमेकडील दोन्ही स्कायवॉक निष्कासित होणार
पूर्व-पश्चिमेकडील दोन्ही स्कायवॉक निष्कासित होणार फोटो: ठाणे वैभव
उल्हासनगर रेल्वे स्थानक परिसराच्या विकासाला मिळणार चालना
उल्हासनगर: रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि भविष्यातील विकासकामांना अडथळा ठरत असलेले उल्हासनगर पूर्व व पश्चिमेकडील दोन्ही स्कायवॉक निष्कासित करण्याचा ठराव सोमवारच्या महासभेत मंजूर करण्यात आला. त्यामुळे रेल्वे स्थानक परिसराच्या विकासाला चालना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सन २०१० मध्ये एमएमआरडीएच्या माध्यमातून उल्हासनगर रेल्वे स्थानक परिसरात स्कायवॉक उभारण्यात आला होता. मात्र, कालांतराने या स्कायवॉकची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली. हा स्कायवॉक उल्हासनगर महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला. अलीकडच्या काळात स्कायवॉकची अवस्था अत्यंत धोकादायक बनली होती. लोखंडी रेलिंग चोरीला जाणे, काही भाग गंजल्यामुळे जाड पत्रे खाली पडणे, तसेच अन्य भागांची झालेली दुरवस्था यामुळे रेल्वे स्थानक परिसरात रिक्षांच्या रांगेत उभे राहणारे रिक्षाचालक आणि प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता. त्याचबरोबर नागरिकांपेक्षा असामाजिक तत्त्वांचा वावर वाढल्याने हा स्कायवॉक सुरक्षेच्या दृष्टीनेही गंभीर प्रश्न बनला होता.
या पार्श्वभूमीवर नगरसेवक चंद्रशेखर यादव यांनी महासभेत स्कायवॉक निष्कासित करण्याची मागणी केली होती. सभागृह नेते तथा शिवसेना गटनेते अरुण आशान, नगरसेवक शेखर यादव, सोनू चानपूर, प्रदीप गोडसे, सूरज सोनकांबळे, माजी महापौर लिलाबाई आशान, शिक्षण समिती सभापती साक्षी सुर्वे, ज्योत्स्ना जाधव, कांता पवार, इंदिरा पाटील, काजल जग्यासी आणि संगीता सपकाळ यांनीही या मागणीला समर्थन दिले होते. यासाठी स्थायी समितीने तातडीने मंजुरी द्यावी, अशी मागणी सभापती कलवंतसिंग (बिट्टू) सोहता यांच्याकडे करण्यात आली होती.
सोमवारी झालेल्या महासभेत सभागृह नेते तथा शिवसेना गटनेते अरुण आशान यांनी उल्हासनगर पूर्वेकडील स्कायवॉक निष्कासित करण्याची मागणी केली. या मागणीला शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी अनुमोदन देत, पश्चिमेकडे सॅटिस प्रकल्प तसेच रेल्वे मार्गाच्या भविष्यातील विकासामुळे पश्चिमेकडील स्कायवॉकही निष्कासित करण्यात यावा, अशी मागणी केली. त्यानंतर पूर्व आणि पश्चिमेकडील दोन्ही स्कायवॉक निष्कासित करण्यास महासभेने मंजुरी दिली.
स्कायवॉक हटविल्यानंतर रिक्षांच्या रांगा अधिक व्यवस्थित आणि सुटसुटीत होण्याची शक्यता आहे. तसेच रेल्वे स्थानक परिसरात मिनी बस सेवा सुरू करण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600