जिल्हा
फक्त ७७० ग्रॅमच्या बाळासाठी देवदूत ठरले 'सिव्हिल'चे डॉक्टर
फक्त ७७० ग्रॅमच्या बाळासाठी देवदूत ठरले 'सिव्हिल'चे डॉक्टर
फोटो: ठाणे वैभव
ठाणे: अवघे ७७० ग्रॅम वजन आणि केवळ २९ आठवड्यांत जन्मलेली चिमुकली... जगण्याची धडपड सुरू असतानाच ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या (सिव्हिल) नवजात शिशु विभागाने त्याला मायेची ऊब आणि अत्याधुनिक उपचारांची साथ दिली. तब्बल अडीच महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर या बाळाचे वजन एक किलो १३० ग्रॅम झाले असून, सरकारी रुग्णालयातील आरोग्यसेवेचे हे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.
२२ एप्रिल २०२६ रोजी एका महिलेची सिव्हिल रुग्णालयात प्रसूती झाली. बाळाचा जन्म अवघ्या २९ आठवड्यांत झाल्याने ते अतिप्रिमॅच्युअर होते. जन्मावेळी त्याचे वजन केवळ ७७० ग्रॅम असल्याने तातडीने नवजात शिशु अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी चोवीस तास बाळावर बारकाईने लक्ष ठेवत आवश्यक उपचार सुरू ठेवले.
प्रत्येक दिवस बाळासाठी नवी परीक्षा होती. श्वसनाचा आजार, औषधोपचार, संसर्गापासून संरक्षण, योग्य पोषण आणि सातत्यपूर्ण वैद्यकीय देखरेख यामुळे बाळाची प्रकृती हळूहळू सुधारत गेली. उपचारांना सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने बाळाचे वजन वाढत आज ते एक किलो १३० ग्रॅम झाले आहे. ही बाब बाळाच्या दृष्टीने अत्यंत दिलासादायक ठरली असल्याचे कुटुंबियांनी सांगितले.
ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातील नवजात शिशु विभागात दरवर्षी कमी वजनाच्या आणि अकाली जन्मलेल्या अनेक बालकांवर यशस्वी उपचार केले जातात. आधुनिक वैद्यकीय सुविधा, प्रशिक्षित तज्ज्ञ डॉक्टर, अनुभवी परिचारिका आणि समर्पित आरोग्य कर्मचारी यांच्या संयुक्त प्रयत्नातून अनेक चिमुकल्यांना नवजीवन मिळत आहे. आर्थिक परिस्थितीमुळे उपचारांची चिंता करणाऱ्या पालकांसाठी सिव्हिल रुग्णालय मोठा आधार ठरत आहे.
प्रत्येक नवजात बाळाचे जीवन आमच्यासाठी अमूल्य आहे. वेळेवर निदान, योग्य उपचार आणि पालकांचे सहकार्य मिळाल्यास अनेक गंभीर परिस्थितींवर यशस्वीपणे मात करता येते. शासकीय रुग्णालयातही गुणवत्तापूर्ण आणि तज्ज्ञ आरोग्यसेवा उपलब्ध असल्याचे डॉ. कैलास पवार यांनी सांगितले.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600