जिल्हा
घोरपडी नदीचा पूल मोजतोय अखेरच्या घटका
घोरपडी नदीचा पूल मोजतोय अखेरच्या घटका
फोटो: ठाणे वैभव
शहापूर तालुक्यातील ७० टक्के नागरिकांच्या दळणवळणावर येणार संकट
शहापूर : शहापूर-किन्हवली या अतिमहत्वाच्या मार्गावरील घोरपडी नदीवरील पुलाची अवस्था अत्यंत धोकादायक बनली असून पुलाच्या संरचनेला तडे जाणे, संरक्षण भिंती व बाजूचा भराव खचणे यामुळे हा पूल ढासळण्याच्या उंबरठ्यावर असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. वेळेत दुरुस्ती न झाल्यास या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हा मार्ग केवळ शहापूर- किन्हवलीपुरता मर्यादित नसून मुरबाड तालुका तसेच माळशेज, किन्हवली, डोळखांब, टाकीपठार, नडगाव, लेनाड, सरळगाव तसेच समृद्धी महामार्गाकडे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. शहापूर तालुक्यातील सुमारे ७० टक्के नागरिक या मार्गावरून दैनंदिन प्रवास करतात. त्यामुळे पुलाला कोणतीही हानी झाल्यास हजारो प्रवासी, विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी आणि रुग्णवाहिका सेवांवर त्याचा थेट परिणाम होणार आहे.
सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीच्या प्रवाहाचा वेग वाढला असून पुलाच्या पायाचे दगड निखळत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पुलाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे. दरम्यान एमएसआरडीसी विभागाने त्वरित पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यक दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत. तसेच वाहतुकीच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी अशी मागणी वाहन चालकांकडून केली जात आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात गंभीर अपघात किंवा संपूर्ण वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
घोरपडी नदीवरील पुलाची सद्यस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. या मार्गावरून दररोज हजारो नागरिक, विद्यार्थी, शेतकरी तसेच आपत्कालीन सेवा वाहने प्रवास करतात. पुलाची झालेली पडझड आणि संरक्षण भिंतींचे नुकसान याबाबत आम्ही एमएसआरडीसी प्रशासनाला लेखी कळवले होते. मात्र याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही. प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. वेळेत उपाययोजना न झाल्यास वाहतूक ठप्प होण्याबरोबरच मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, अशी भीती गोठेघर ग्रामपंचायतीचे सरपंच गणेश कामडी यांनी व्यक्त केली.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600