जिल्हा
नाले सफाईबाबत नागरिकांच्या तक्रारींना प्राधान्य-आयुक्त
नाले-गटारांच्या सफाईअभावी
पाणी साचल्यास ठेकेदारास दंड (हेडिंग)
ठाणे: शहरात सर्वत्र सुरू असलेली पहिल्या टप्प्यातील नाले सफाईची कामे २५ मे पूर्वी पूर्ण करावीत. नाले सफाईबाबत नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या सूचना, तक्रारी यांची तातडीने दखल घेऊन त्यावर उपाय करावेत, असे निर्देश महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी बुधवारी दिले.
नाले सफाई करणारे कंत्राटदार, त्यावर लक्ष ठेवणारे स्वच्छता निरीक्षक, त्यांचे अधिकारी, सहाय्यक आयुक्त, उपायुक्त ही वरिष्ठ यंत्रणा यांच्याशी नाले सफाईबद्दल आयुक्तांनी थेट संवाद साधला. प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त हे प्रभागातील संपूर्ण नाले सफाईच्या कामाचे समन्वयक आहेत. घनकचरा व्यवस्थापन, अभियांत्रिकी, यांत्रिकी, विद्युत आणि आपत्कालीन व्यवस्थापन हे सर्व विभाग एकत्रितपणे काम करतील.
नाले सफाईच्या कामाचे ड्रोनद्वारे चित्रीकरण केले जात आहे. त्यातून आधीची आणि नंतरची स्थिती समजणार आहे. त्यामुळे हे काम काळजीपूर्वक करावे. तसेच, नाल्यात प्रत्यक्ष उतरून काम करणाऱ्या कामगारांना गमबूट, हातमोजे आणि मास्क असेलच पाहिजेत याबद्दल दक्षता घेतली जावी. त्यांच्या आरोग्यास धोका पोहोचणार नाही. याची काळजी कंत्राटदारांनी घ्यावी, असेही आयुक्तांनी सांगितले.
नालेसफाई करताना तरंगणारा कचरा उचलला गेल्यावर, मध्येच उगवलेली झुडपे, मोठा दगड, इतर कचरा काढावा. पोकलेन मशीनच्या मदतीने जे नाले साफ केले जात आहेत तेथे तळापासून सफाई झाली पाहिजे. २४ ते ४८ तासांच्या आत बाहेर काढलेला गाळ उचलला गेला पाहिजे. मशीन नाल्यात उतरवण्यासाठी नाल्याची भिंत तोडली असेल तर ती पूर्ववत केली जावी. गोणी रचून तात्पुरती व्यवस्था नको, अशा स्पष्ट सूचना आयुक्तांनी दिल्या.
नाल्यांची तोंडे ज्या ठिकाणी खाडीत उघडतात ते भागही स्वच्छ केले जावेत. तेथे कचरा साचणार नाही आणि पाण्याचा जलद निचरा होईल याची काळजी घ्यावी.
रस्त्यावरून दिसणारा नाला साफ केला आणि जो सहज दिसत नाही तो भाग तसाच ठेवला तर कारवाई केली जाईल, असा इशारा ही आयुक्तांनी दिला.
नाले किंवा गटार साफ नसल्याने पाणी साचले तर कंत्राटदाराला प्रती घटना २० हजार रुपये दंड केला जाणार आहे, हेही आयुक्तांनी अधोरेखित केले.
पावसाळ्यापूर्वी, घरातील अनावश्यक सामान, कचरा नाल्यात टाकला जातो, पाण्यासोबत तोही वाहून जाईल असे नागरिकांना वाटते. पण हा कचरा साठून राहतो, हे लक्षात घेवून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी आयुक श्री. बांगर यांनी केले.
या बैठकीस, अतिरीक्त आयुक्त (२) संजय हेरवाडे, नगर अभियंता प्रकाश सोनाग्रा, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त तुषार पवार उपस्थित होते. कार्यकारी अभियंता आणि कंत्राटदार यांनी त्यांना प्रत्यक्ष कामात येणाऱ्या अडचणीही यावेळी आयुक्तांसमोर मांडल्या.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600