जिल्हा
आज महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल; सरन्यायाधीशांचे संकेत
नवी दिल्ली: सत्तासंघर्षाच्या निकालाचा काऊंटडाऊन सुरू झाला झाला असून या निकालाकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. हा निकाल उद्या येणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी एका सुनावणी दरम्यान निकालासंदर्भात टिपण्णी केली आहे.
घटनापीठाकडून उद्या दोन महत्वाचे निकाल लागण्याचे संकेत सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी दिले आहेत. त्यामुळे सत्ता संघर्षावरही उद्या निकाल लागण्याची दाट शक्यता आहे.
20 जून 2022 रोजी महाराष्ट्रात विधानपरिषद निवडणुकीनंतर जे नाट्य रंगले, त्यातून सत्तांतरापर्यंत आणि शिवसेनेच्या फुटीपर्यंत घडामोडी घडल्या. तेव्हापासून हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आले. 14 फेब्रुवारी ते 16 मार्च सलग सुनावणी झाली. आणि तेव्हापासून हा निकाल राखीव आहे. ज्या घटनापीठाला हा निकाल द्यायचा आहे. त्या घटनापीठाचे दोन निकाल प्रलंबित आहेत. एक महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा आणि दुसरा दिल्ली आणि केंद्र सरकारमधल्या अधिकारांच्या वादाचा. दिल्ली-केंद्र सरकारचे प्रकरण आपल्या आधीच पूर्ण झाले आहे. 17 जानेवारीपासून हाही निकाल प्रलंबित आहे.
गेल्या वर्षी 30 जून रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तत्पूर्वी सूरत ते गुवाहाटी आणि तेथून गोवामार्गे महाराष्ट्रात झालेले सत्तांतर संपूर्ण भारतात आजही चर्चेचा विषय आहे. या पार्श्वभूमीवर सत्तासंघर्षाचा निकाल कुणाच्या बाजूने लागेल यांची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे वकिलांसोबत तातडीनं दिल्लीला रवाना झाले आहेत.
सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा आणि राजकीय घडामोडींचा संबंध नसतो. पण सध्या कर्नाटकमध्ये विधानसभेच्या निवडणुका सुरु आहेत. आज मतदान झाले असून 13 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्रासारख्या महत्वाच्या राज्याच्या राजकारणाचा निकाल संपूर्ण देशावर परिणाम करणारा असेल.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600