जिल्हा
दोरखंडाने वाहने ओढत काँग्रेसचा हल्लाबोल
दोरखंडाने वाहने ओढत काँग्रेसचा हल्लाबोल
फोटो: ठाणे वैभव
ठाणे: पेट्रोल डिझेल, गॅस आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या दरांविरोधात ठाणे शहर काँग्रेसने बुधवारी आक्रमक होत दोरखंडाने वाहने ओढत जोरदार केले. महागाईच्या जोखडात जनता अडकली आहे असा संदेश देत शहरातील तीन पेट्रोल पंपावरून काँग्रेस कार्यकर्त्यांनी वाहनांना दोरखंड बांधून मोर्चा काढला.
या आंदोलनाचे नेतृत्व ठाणे शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी केले. शरीराला दोरखंड बांधून वाहन ओढत त्यांनी केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांविरोधात अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. इंधन दरवाढ कमी करा... महागाई रोखा... सामान्यांना दिलासा द्या... अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात संताप व्यक्त केला.
वाढत्या इंधन दरांचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला असून त्याचा परिणाम भाजीपाला, अन्नधान्य, दूध, गॅस तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर होत असल्याचे त्यांनी सांगितले. सामान्य नागरिकांचे महिन्याचे बजेट कोलमडले असून केंद्र सरकारने इंधनावरील करवाढ तातडीने कमी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या आंदोलनात शहर महिला अध्यक्ष स्मिता वैती, सेवादल अध्यक्ष रवी कोळी, प्रदेश सदस्य निशिकांत कोळी, भालचंद्र महाडिक, महेंद्र म्हात्रे, शिरीष घरत, प्रसाद पाटील, कामगार नेते मोहन तिवारी, रवींद्र आंग्रे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600