जिल्हा
वाशी एपीएमसी कांदा-बटाटा मार्केटमध्ये घाणीचे साम्राज्य
वाशी एपीएमसी कांदा-बटाटा मार्केटमध्ये घाणीचे साम्राज्य
फोटो: ठाणे वैभव
दुर्गंधीमुळे व्यापाऱ्यांचे आरोग्य धोक्यात
नवी मुंबई: वाशी येथील एपीएमसी कांदा-बटाटा मार्केट आवारात गेल्या दोन दिवसांपासून साफसफाई न झाल्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. बाजारातील ए, सी आणि ई विभागांमध्ये कचरा-कुंड्या पूर्णपणे भरून वाहत असून, सडलेले कांदे-बटाटे थेट रस्त्यावर पसरलेले आहेत. त्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून, व्यापारी, कामगार तसेच येणाऱ्या ग्राहकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या अस्वच्छतेमुळे बाजारातील घटकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विशेषतः उष्णतेच्या पार्श्वभूमीवर सडलेल्या भाजीपाला व कचऱ्यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेक व्यापाऱ्यांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या असून, तातडीने साफसफाई करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, बाजार समितीच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप व्यापाऱ्यांकडून केला जात आहे. नियमित स्वच्छता राखली जात नसल्याने अशा समस्या वारंवार निर्माण होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर बाजार समितीने तात्काळ यंत्रणा हलवून संपूर्ण परिसराची स्वच्छता करावी, कचरा उचलण्याची प्रक्रिया नियमित करावी आणि आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी जोरदार मागणी व्यापारी व नागरिकांकडून करण्यात येत आहे.
कांदा-बटाटा बाजार आवारात साचलेला कचरा गुरुवारी दुपार पर्यंत जेसीबीच्या साह्याने साफ करण्यात आला आहे, अशी माहिती स्वच्छता अधिकारी किरण घोलप यांनी दिली.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600