जिल्हा
शाळा, कॉलेज परिसरातील पान टपरीवर ई सिगारेट विक्री जोरात
शिवसेना नेते राजन विचारे यांची मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तांकडे कारवाईची मागणी
ठाणे: मीरा-भाईंदर शहरात शाळा, कॉलेजमधील विद्यार्थी इलेक्ट्रिक सिगारेटचा वापर मोठ्या प्रमाणात करत असून शहरातील शाळा-कॉलेज परिसरातील पानटपरीवर इलेक्ट्रिक सिगारेट विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी मीरा-भाईंदर पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांच्याकडे केली.
यावेळी संपर्कप्रमुख नरेश मणेरा, मीरा-भाईंदर जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, उपजिल्हाप्रमुख मनोज मयेकर महिला आघाडी नीलम धवन, प्रकाश जैन उपस्थित होते.
मीरा-भाईंदर शहरातील वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे अनधिकृत अनेक शाळा व कॉलेज त्याचबरोबर क्लासेस यांचेही प्रमाण तितकेच वाढलेले आहे. यापूर्वी कॉलेजपासून मुलांना अमली पदार्थाचे व्यसन सुरू होत होते, परंतु आता इयत्ता पाचवी ते सातवीपासूनच मुलांना अमली पदार्थाचे व्यसन सुरू झाले आहे.
सध्या मुले वयात येण्याची प्रक्रिया अधिक वेगाने वाढत असल्याने सोशल मीडियाचा आधार घेऊन मुलांमध्ये लैंगिक इच्छा होणे, दारू पिणे, गांजा ओढणे, सिगारेटच झुरका मारणे अशी ओढ मुलांमध्ये दिवसेंदिवस वाढत चालली आहे तसेच नव्याने सुरू झालेली वेगवेगळ्या फेवरमध्ये इलेक्ट्रिक सिगारेट या पान टपरीवर विक्री केल्या जातात. व याचीच सुरुवात सिगारेट व गांजा यामध्ये होत आहे. त्यामुळे पान टपरीबरोबर सायकलवर विक्री करणाऱ्या इसमांवर कारवाई करून त्यांना गजाआड करा तसेच शाळा कॉलेज परिसरात पोलिसांची गस्त वाढवा, अशी मागणी मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तांकडे श्री. विचारे यांनी केली आहे. यासंदर्भात लवकरच ठाणे व नवी मुंबई पोलीस आयुक्तांचीही भेट घेणार आहे, असे सांगण्यात आले आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600