जिल्हा

अखेर 'तो' नरभक्षक बिबट्या जेरबंद

अखेर 'तो' नरभक्षक बिबट्या जेरबंद
अखेर 'तो' नरभक्षक बिबट्या जेरबंद फोटो: ठाणे वैभव
लाद्याची वाडीतील चिमुरड्याचा घेतला होता बळी शहापूर: शहापूर तालुक्यातील डोळखांब वनपरिक्षेत्रात गेल्या अनेक दिवसांपासून दहशत निर्माण करणारा आणि लाद्याची वाडी येथील आठ वर्षीय कृष्णा आगीवले या निष्पाप मुलाचा बळी घेणारा नरभक्षक बिबट्या अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. बिबट्याला यापूर्वी दोन वेळा पिंजऱ्यातून निसटण्यात यश आले होते. या कारवाईमुळे परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला असून अनेक दिवसांपासून निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणाला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. यावेळी वनपरीक्षेत्र अधिकारी अजय चव्हाण,कसारा पोलीस निरीक्षक सुरेश गावीत, शिवाजी वीर भालचंद्र खडके, शेजारील गावांमधील सरपंच यांसह वनपाल, वनरक्षक व ग्रामस्थ यांनी विशेष सहकार्य केले. बिबट्याने डोळखांब परिसरातील अनेक गावांमध्ये वारंवार दर्शन देत नागरिकांमध्ये भीती निर्माण केली होती.विशेषतः लहान मुले, महिला आणि शेतकरी वर्गामध्ये मोठी दहशत पसरली होती. काही दिवसांपूर्वी लाद्याची वाडी येथील जंगलात रानमेवा गोळा करण्यासाठी गेलेल्या कृष्णा आगीवाले या आठ वर्षीय मुलावर बिबट्याने अचानक हल्ला करून त्याला ठार केले होते. या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली होती. घटनेनंतर ग्रामस्थांनी वनविभागाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीने बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली होती. तसेच ग्रामस्थ, विविध सामाजिक संघटना आणि श्रमजीवी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला होता. नागरिकांच्या वाढत्या दबावानंतर वनविभागाने विशेष पथके तयार करून परिसरात पिंजरे, ट्रॅप कॅमेरे आणि रात्री गस्त वाढवली होती. अखेर सलग अनेक दिवसांच्या शोधमोहीमेनंतर संबंधित नरभक्षक बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अडकला. बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती समोर येताच ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. मात्र या घटनेत निष्पाप कृष्णाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वनविभागाकडून पकडण्यात आलेल्या बिबट्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असून पुढील निर्णय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच नागरिकांनी रात्रीच्या वेळी एकटे बाहेर न पडणे,लहान मुलांवर लक्ष ठेवणे आणि वनक्षेत्रालगत सतर्क राहण्याचे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600