जिल्हा
भिवंडीतील अवैध भंगार गोदामे असुरक्षित; लवकरच कारवाई!
भिवंडी : भिवंडीतील बेकायदा भंगार गोदामे आता सुस्थितीत नाहीत, अवैध भंगार गोदामांमुळे नेहमी आगी लागण्याच्या घटना घडतात. त्याचा फटका लोकवस्तीला देखील बसतो. या घटना थांबविण्यासाठी प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
भिवंडी शहर व परिसरात अनेक भंगार गोदामे बेकायदेशीरपणे सुरू आहेत. त्यांच्याकडे या व्यवसायासाठी कोणतेही प्रमाणपत्र नाही. अवैध भंगार गोदामामुळे दोन दिवसांपूर्वी शहरातील फातमा नगर परिसरात आगीची मोठी घटना घडली होती. शहर आणि परिसरात वारंवार होणाऱ्या अशा घटनांवर अंकुश आणण्यासाठी त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी भंगार गोदामास लागून असलेल्या लोकवस्तीमधून होऊ लागली आहे.
भिवंडीतील अंजूरफाटा, राहनाळ, पूर्णा, कशेळी, धामणकरनाका, रोशनबाग, कल्याण रोड, नदीनाका, श्रीरंगनगर, आसबीसह शहर व ग्रामीण परिसरात प्रत्येक ठिकाणी बेकायदेशीर भंगाराची गोदामे असून तेथे कोणत्याही प्रकारचा माल ठेऊन विकला जातो. भंगार व्यावसायिक त्यांच्या इच्छेनुसार विविध प्रकारचा माल खरेदी करून विक्री करतात. अशा गोदामांमध्ये स्फोटक रसायनाचे ड्रम देखील साठवून ठेवतात. त्यामुळे आग लागून बळी गेल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत.तसेच अनेकवेळा भंगार मालाचे व्यापारी चोरीचा माल देखील विकत घेतात. भिवंडी आणि परिसरात भंगाराच्या गोदामातून लाखो रुपयांच्या व्यवहाराची उलाढाल होत असते. मात्र त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा परवाना नाही. तसेच त्यांच्या व्यवसाय संबंधी पोलिसांसह कोणत्याही सरकारी कार्यालयात नोंद नाही.मात्र आग लागल्यानंतर संबंधित सरकारी कार्यालयाचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी धाव घेऊन कारवाई करतात. त्यानंतर जैसे थे भंगार व्यवसाय सुरु राहतो.
याबाबत भिवंडीचे पोलीस उपायुक्त मोहन दहीकर म्हणाले की, बेकायदा गोदाम मालकांची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, जेणेकरून शहरात जाळपोळीच्या घटना पुन्हा घडणार नाहीत.
भिवंडी महापालिकेचे आयुक्त अजय वैद्य यांनी सांगितले कि, महापालिका क्षेत्रातील भंगाराच्या सर्व बेकायदा भंगार गोदामांचे सर्वेक्षण करून त्या गोदामांवर लवकरच कारवाई केली जाईल.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600