जिल्हा
ऐन उन्हाळ्यात वन्य प्राण्यांच्या पाण्याच्या तबकड्या धूळ खात
ऐन उन्हाळ्यात वन्य प्राण्यांच्या पाण्याच्या तबकड्या धूळ खात
फोटो: ठाणे वैभव
लाखो रुपयांच्या खरेदीबाबत प्रादेशिक व वन्यजीव विभाग अनभिज्ञ
शहापूर: उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असतांना जंगलातील नैसर्गिक पाणवठे आटत चालले आहेत. अशा परिस्थितीत वन्य प्राण्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी वन विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जात असल्याचे सांगितले जाते. मात्र वन्य प्राण्यांना पाणी पिण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या तबकड्या शहापूर तालुक्यातील आसनगाव काष्ट विक्री आगारात बेवारस अवस्थेत पडून असल्याचे चित्र समोर आले आहे.
याबाबत वन्यजीव व प्रादेशिक विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, ती खरेदी आमची नाही, असे उत्तर देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
वन्यजीव विभागाकडून उन्हाळ्यात जंगलात व पाणवठ्यांजवळ या तबकड्या ठेवून वन्य प्राणी व पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्याचे उद्दिष्ट असते. मात्र ऐन उन्हाळ्यातच या तबकड्या वापरात न आणता पडून असल्याने वन्यजीव संरक्षणाबाबत संबंधित यंत्रणा किती गंभीर आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे याबाबत वन्यजीवचे वन परीक्षेत्र अधिकारी राकेश साहू यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. ठाणे वन्यजीव विभागाचे प्रमुख उपवनसंरक्षक राहुल गवई यांच्याशी संपर्क केला असता या तबकड्यांची खरेदी ठाणे वन्यजीव विभागाकडून करण्यात आली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वनविभाग शहापूर प्रादेशिक विभागाचे सहाय्यक उपवनसंरक्षक महेश चोपडे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन याबाबत विचारणा केली असता ही खरेदी आमच्याकडून केली नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे शासनाच्या एकाच छत्राखाली काम करणाऱ्या दोन्ही विभागांमध्ये संवादाचा अभाव असल्याचे निदर्शनास आले.
तथापि जंगलातील पाण्याची कमतरता वाढल्याने अनेकदा बिबट्या व इतर वन्यप्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे वळतांना दिसत आहेत. अशावेळी वन विभागाने योग्य नियोजन करून पाण्याच्या तबकड्या आणि पाणवठ्यांची व्यवस्था करणे अपेक्षित असतांना त्या बेवारस अवस्थेत पडून असल्याने प्रादेशिक वन विभाग व वन्यजीव विभाग या विभागांना तबकड्या खरेदीची माहिती नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दरम्यान वन विभागाच्या वन्यजीव विभागाने व प्रादेशिक वन विभागाने समन्वय साधावा. तसेच या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन पाण्याच्या तबकड्या जंगलातील योग्य ठिकाणी ठेवून वन्य प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी पर्यावरण प्रेमी व नागरिकांकडून केली जात आहे. अन्यथा या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी तसेच शासनाच्या निधीचा अपव्यय झाला असल्यास दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे.
या वॉटर पॅनची खरेदी आमची नसून शहापूर डिव्हिजनने केलेली आहे. ही खरेदी केलेल्या वस्तू तिथे का पडून आहेत हे शहापूर उप वनसंरक्षक मल्होत्रा यांना विचारा, असे राहुल गवई, उपवनसंरक्षक (वन्यजीव) ठाणे यांनी सांगितले.
आसनगाव काष्ट आगारात असलेल्या पाण्याच्या तबकड्यांची खरेदी आम्ही केलेली नसून ती वन्यजीव संरक्षण विभागाने खरेदी केलेली आहे. त्यांनी तुम्हाला दिलेली माहिती चुकीची आहे, असे महेश चोपडे, सहाय्यक उपवनसंरक्षक, वनविभाग शहापूर.(प्रादेशिक) यांनी सांगितले.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600