जिल्हा
धावत्या लोकलमध्ये प्रसूतीकळा; महिलेने दिला गोंडस कन्येला जन्म
धावत्या लोकलमध्ये प्रसूतीकळा; महिलेने दिला गोंडस कन्येला जन्म
फोटो: ठाणे वैभव
ठाणे : टिटवाळा येथून मुंबईतील जे. जे. रुग्णालयात प्रसूतीसाठी निघालेल्या गर्भवती महिलेची धावत्या लोकलमध्ये अचानक प्रसूतीकळा सुरू झाल्याने ठाणे रेल्वे स्थानकात तिने गोंडस कन्येला जन्म दिला. रेल्वे प्रशासन, रेल्वे पोलीस, वैद्यकीय कर्मचारी आणि सहप्रवासी महिलांच्या तत्पर मदतीमुळे आई आणि नवजात बालिकेची सुखरूप सुटका झाली.
शीतल कांबळे रा. टिटवाळा या शनिवारी सायंकाळी आपल्या पतीसमवेत टिटवाळा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस धीम्या लोकलने मुंबईकडे निघाल्या होत्या. सायंकाळी सुमारे ५.३४ वाजण्याच्या सुमारास लोकल ठाणे स्थानकात पोहोचत असताना त्यांना अचानक प्रसूतीकळा सुरू झाल्या. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रेल्वे प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले. यावेळी डब्यातील महिला प्रवाशांनीही धाव घेऊन प्रसूतीसाठी आवश्यक मदत केली.
अल्पावधीतच शीतल कांबळे यांनी ठाणे स्थानकात एका गोंडस मुलीला जन्म दिला. प्रसूतीनंतर रेल्वे पोलिसांनी आई आणि नवजात बालिकेला तातडीने कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. शीतल कांबळे आणि त्यांच्या नवजात मुलीची प्रकृती स्थिर असून दोघींवर आवश्यक उपचार सुरू आहेत. अशी माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अनिरुद्ध माळगांवकर यांनी दिली.
धावत्या लोकलमध्ये घडलेल्या या अनपेक्षित प्रसंगात रेल्वे प्रशासन, रेल्वे पोलीस, वैद्यकीय कर्मचारी आणि सहप्रवासी महिलांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे आई आणि नवजात बालिकेचे प्राण सुरक्षित राहिले.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600