जिल्हा
अल्पवयीन मुलीवर रेल्वे यार्डात अत्याचार
अल्पवयीन मुलीवर रेल्वे यार्डात अत्याचार
फोटो: ठाणे वैभव
कल्याण रेल्वे स्थानकातून १४ वर्षीय मुलीचे अपहरण; आरोपी पोलिसांच्या ताब्यात
कल्याण : कल्याण रेल्वे स्थानक परिसरात एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला रेल्वे यार्डात नेऊन लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कल्याण जीआरपी पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी सौरभ सोनवणे याला अटक केली आहे.
रेल्वे स्थानकासारख्या गजबजलेल्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पीडित 14 वर्षांची मुलगी आपल्या मामाला भेटण्यासाठी कल्याण येथे आली होती. अहिल्यानगरहून निघाल्यानंतर ती कल्याण बस स्थानकात उतरली. त्यानंतर तिला खोपोलीला आपल्या मामाकडे जायचं होतं. त्यामुळे ती कल्याण रेल्वे स्थानकात गेली. तिथे ती लोकलची वाट पाहत असताना संधी साधत आरोपी सौरभ सोनवणे याने पीडित मुलीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला.
मुलीने जेव्हा आपला मोबाईल परत मागितला, तेव्हा 'मोबाईल पाहिजे असेल तर माझ्यासोबत पोलीस स्टेशनला चल' अशी बतावणी केली. परगावातून आल्याने ती ही घाबरली. ती त्याच्यासोबत जायला निघाली. मात्र आरोपी सौरभने तिला पोलीस स्टेशनला नेण्याऐवजी फसवणूक करून कल्याण रेल्वे यार्डात नेले. त्यानंतर तिथे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तो तिला तिथेच सोडून निघून गेला.
या भयानक प्रसंगातून सुटका करून घेत पीडित मुलीने कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात पोहोचत घडलेला प्रकार सांगितला. घटनेचे गांभीर्य ओळखून कल्याण रेल्वे क्राईम ब्रँच आणि जीआरपी पोलिसांनी तत्काळ रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्हीच्या साहाय्याने पोलिसांनी आरोपी सौरभ सोनवणे याला शोधून काढून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. मात्र कल्याणसारख्या गजबजलेल्या रेल्वे स्थानकात असा प्रकार घडल्याने सर्वच जण घाबरले आहेत. शिवाय पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600