जिल्हा
ऑनलाईन औषध विक्रीविरोधात २० मे रोजी देशभरातील केमिस्टचा बंद
ऑनलाईन औषध विक्रीविरोधात २० मे रोजी देशभरातील केमिस्टचा बंद
फोटो: ठाणे वैभव
१२.५० लाख मेडिकल दुकाने सहभागी होणार; सरकारला मागण्यांकडे लक्ष देण्याचा इशारा
कल्याण : बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री, नियमबाह्य सवलती आणि जीएसआर अधिसूचना रद्द करण्याच्या मागण्यांसाठी ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनतर्फे २० मे रोजी देशव्यापी बंद पुकारण्यात आला आहे. देशभरातील सुमारे १२.५० लाख मेडिकल दुकाने या बंदमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ (आप्पा) शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ठाणे जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख, सचिव सुरेश भट, कोषाध्यक्ष ॲड. गणेश शेळके यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
औषध विक्री व्यवसाय हा ड्रग अँड कॉस्मेटिक कायदा १९४० आणि अधिनियम १९४५ अंतर्गत चालतो. मात्र ऑनलाईन औषध विक्रीसंदर्भात कायद्यात स्पष्ट तरतूद नसतानाही देशभरात सर्रास ऑनलाईन औषध विक्री सुरू असल्याचा आरोप शिंदे यांनी केला. केंद्र सरकारने २०१८ मध्ये यासंदर्भात अधिसूचना जारी केली असली तरी त्याचे अद्याप कायद्यात रूपांतर झालेले नाही. याबाबत दिल्ली उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असून न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतरही सरकार कारवाई करत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
कोरोना काळात घरपोच औषध वितरणासाठी दिलेली तात्पुरती सूट अद्याप कायम ठेवण्यात आल्याने ऑनलाईन कंपन्या त्याचा गैरफायदा घेत असल्याचेही त्यांनी सांगितले. कॉर्पोरेट कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात दिल्या जाणाऱ्या डिस्काउंटमुळे छोट्या औषध विक्रेत्यांचा व्यवसाय धोक्यात आल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली.
ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर (DPCO) अंतर्गत औषध विक्रेत्यांना मिळणाऱ्या नियंत्रित नफ्याच्या तरतुदींमध्ये बदल करण्याची तसेच डॉक्टरांनी लिहिलेल्या औषधांच्या पर्यायी ब्रँडची औषधे देण्याचा अधिकार औषध विक्रेत्यांना देण्याची मागणी संघटनेने केली आहे.
केंद्र सरकारकडे वारंवार निवेदने देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर देशव्यापी बंदचा निर्णय घेतल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. मागण्यांची दखल न घेतल्यास पुढील काळात बेमुदत बंद किंवा मेडिकल दुकानांच्या चाव्या केंद्र सरकारला पाठवण्याचा इशाराही त्यांनी दिला.
राज्य संघटनेचे सचिव अनिल नावंदर यांनी महाराष्ट्रात हा बंद शंभर टक्के यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त केला.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600