ठाणे : शहरातील अनधिकृत, धोकादायक, अतिधोकादायक इमारती पाडण्यासाठी ठाणे महापालिकेने यावर्षी तब्बल पाच कोटींची वसुली केली आहे. दरवर्षी ही वसुली केवळ दीड कोटींच्या घरात असते.
ठाणे महापालिका क्षेत्रात ७४ इमारती या अतिधोकादायक जाहीर करण्यात आल्या असून चार हजारांपेक्षा अधिक इमारती या धोकादायक स्थितीत पोहोचल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक ५० अतिधोकादायक इमारती या एकट्या नौपाडा-कोपरी प्रभाग समिती क्षेत्रातील आहेत. अतिधोकादायक इमारतींमधील १३ इमारती रिक्त करून निष्कासित करण्यात आल्या आहेत. तर १७ इमारती रिक्त करण्यात आल्या असल्या तरी अद्याप या इमारती पाडण्यात आलेल्या नाहीत.
धोकादायक, अनधिकृत बांधकामे स्वतःहून पाडण्याची नोटीस संबंधित जागा मालक किंवा इमारत धारकांना दिली जाते. मात्र संबंधित जागा मालक किंवा इमारत धारकांनी स्वतःहून बांधकामे पाडण्याची तयारी दर्शवली नाही तर मात्र पालिका स्वतः अशी बांधकामे पडून बांधकाम पाडण्यासाठी लागणारा खर्च संबंधित जागा मालकांकडून वसुल केला जातो. मात्र दरवर्षी ही वसुली केवळ दीड ते पावणे दोन कोटींच्या घरात असताना यावर्षी मात्र ही वसुली तब्बल पाच कोटींच्या घरात असल्याची माहिती पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
एखादी इमारत निष्कासित करताना धोकादायक, अतिधोकादायक तसेच अनधिकृत बांधकाम अशा सर्वच इमारतींचा समावेश असल्याने ही बांधकामे पाडण्यासाठी पालिकेला संपूर्ण यंत्रणा उभारावी लागते. यासाठी पोलीस बंदोबस्तासोबतच जेसीबी तसेच मनुष्यबळ देखील लागत असल्याने याचा किमान खर्च हा पाच लाखांपर्यंत येतो. तर जशी इमारत आहे तशाप्रकारे हा खर्च वाढत जातो.
गेल्या १० वर्षात ठाणे महापालिकेच्या वतीने अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली असली तरी ही बांधकामे पाडण्यासाठी पालिकेला या १० वर्षात २५ कोटी खर्च करावे लागले आहेत. त्या तुलनेत वसुली मात्र केवळ पावणे दोन कोटींचीच व्हायची. आयुक्त अभिजित बांगर यांनी पालिकेची सूत्रे हातात घेतल्यानंतर त्यांनी केलेल्या कारवाईमध्ये मात्र हा आकडा यावर्षी पाच कोटींपर्यंत पोचला आहे.
प्रभाग केलेली कारवाई दाखल गुन्हे
नौपाडा निरंक निरंक
कोपरी ०२ ०१
वागळे निरंक निरंक
लोकमान्य ०४ निरंक
वर्तकनगर ०२ निरंक
माजिवडा मानपाडा ५८ ०१
उथळसर ०१ निरंक
कळवा ४३ ०७
मुंब्रा ०५ ०५
दिवा ३९ ४९
----------------------------------------------
एकूण १५४ ६३