जिल्हा
आगासन गावातील सर्वेक्षण प्रक्रियेला अखेर स्थगिती
आगासन गावातील सर्वेक्षण प्रक्रियेला अखेर स्थगिती
फोटो: ठाणे वैभव
ठाणे: मौजे आगासन, सेक्टर १० येथील प्रस्तावित विकास आराखडा रस्ता व हॉस्पिटल आरक्षणाच्या अनुषंगाने सुरू करण्यात आलेल्या मोजणी सर्वेक्षण प्रक्रियेस आगासन ग्रामस्थांनी तीव्र हरकत घेतली होती. आयुक्तांबरोबर झालेल्या चर्चेत या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यात आली.
ठाणे महानगरपालिकेचा नवीन विकास आराखडा अद्याप अंतिम मंजूर व अधिसूचित झालेला नसताना सुरू करण्यात आलेली ही प्रक्रिया कायदेशीरदृष्ट्या चुकीची असल्याचा मुद्दा आगासन गाव बचाव संघर्ष समितीच्या वतीने ठामपणे मांडण्यात आला.
या संदर्भात आगासन गाव बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड. रोहिदास मुंडे यांच्या नेतृत्वाखाली उदय मुंडे, प्रवीण म्हात्रे, निलेश मुंडे यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त यांच्यासोबत सकारात्मक चर्चा पार पडली. यावेळी आयुक्तांनी शेतकरी व ग्रामस्थांना योग्य न्याय देण्याचे आश्वासन देत या सर्वेक्षण मोजणी प्रक्रियेस तात्पुरती स्थगिती दिली.
आगासन गावातील शेतकरी, जमीनधारक व ग्रामस्थांच्या हक्कांसाठी हा लढा पुढेही सुरू राहणार असून, गावकऱ्यांच्या एकजुटीमुळेच हा मोठा निर्णय शक्य झाला असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली.
यावेळी संतोष केणे, काळू कोमस्कर, हिरा पाटील, दयानंद म्हात्रे, पद्माकर पाटील, सचिन पाटील, योगेश निकम तसेच आगासन गावातील सर्व ग्रामस्थांची मोलाची साथ लाभली.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600