जिल्हा
उल्हासनगरमधील भाजपचे नेते टीम ओमी कलानी गटात
उल्हासनगरमधील भाजपचे नेते टीम ओमी कलानी गटात
फोटो: ठाणे वैभव
उल्हासनगर: उल्हासनगरच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. भाजपचे प्रभावशाली, अनुभवी आणि शहरात मजबूत पकड असलेले अनेक दिग्गज नेते एकाच दिवशी ‘टीम ओमी कलानी’च्या दोस्ती गठबंधनात दाखल झाले आहेत.
माजी जिल्हाध्यक्ष जमनू पुरसवानी, माजी जिल्हाध्यक्ष व सिंधी साहित्य अकादमी (महाराष्ट्र) अध्यक्ष महेश सुखरामानी, माजी स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश माखीजा आणि राम (चार्ली) परवानी यांनी टीम ओमी कलानी गटात प्रवेश केला आहे. त्यांच्या या पक्षांतरामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून भाजपला मोठा धक्का बसल्याची चर्चा सुरू आहे.
मुंबईतील मालाबार हिल येथील नंदनवन बंगला येथे झालेला प्रवेश सोहळा शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत, घोषणाबाजीच्या वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, टीम ओमी कलानीचे प्रमुख ओमी पप्पू कलानी, पंचम कलानी तसेच उद्योगपती सुमित चक्रवर्ती विशेष उपस्थित होते. एकाच मंचावर सिंधी समाजातील मान्यवर आणि भाजपचे दिग्गज नेते ‘टीम ओमी कलानी’चा झेंडा हातात घेऊन उभे असल्याचे दृश्य पूर्ण सभागृहात उत्साह निर्माण करणारे ठरले.
दरम्यान, या दिग्गज नेत्यांच्या प्रवेशासह शहरातील विविध प्रभागांतील भाजपचे माजी नगरसेवक शिंदे गटात सामील झाल्याने आगामी निवडणुकांमध्ये त्या प्रभागांत उमेदवारी ठरवताना भाजपसमोर मोठी अडचण उभी राहणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच भाजपमधील आणखी काही नाराज नगरसेवक व पदाधिकारी लवकरच शिंदे गटात प्रवेश करू शकतात, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600