जिल्हा
येऊरचे 'ते' सात बंगले अडचणीत
ठाणे : पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असेलल्या येऊर या ठिकाणी नियम धाब्यावर बसवून उभारण्यात आलेले सात बंगले रडारवर आले आहेत.
या अनधिकृत बंगल्याची दखल घेत लोकायुक्तांनी ठाणे महापालिकेला चांगलेच धारेवर धरले असून १४ सप्टेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता या सात बंगल्यांकडे कानाडोळा करणाऱ्या पालिका प्रशासनाची झोप उडाली असून अधिकारी वर्गाची धावपळ सुरू झाली आहे.
येऊर येथे ठाणे महापालिकेचे माजी शिक्षण मंडळ अध्यक्ष सुरेश गडा यांनी उभारलेल्या सात बेकायदा बंगल्यांविरोधात एका सामाजिक कार्यकर्त्याने राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे याचिका दाखल केली होती. याबाबत लोकायुक्तांकडे सुनावणी झाली. या सुनावणीत महापालिकेला काही महत्वाचे आदेश देण्यात आले आहेत. हे सात बंगले अनधिकृत असल्याचे स्पष्ट झाले असल्याने त्यावर कारवाई करणार का असा सवाल उपस्थित करीत एमआरटीपी अंतर्गत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच कोणत्या आधारावर या बांधकामांवर कर आकारणी केली हे स्पष्ट करावे. तसेच तेथील पदनिर्देशीत अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करुन त्याच्यावर कारवाई करावी असे आदेश लोकायुक्तांनी ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना दिले आहेत.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600