जिल्हा

ठाणे जिल्हा परिषदेची जबाबदारी योगेश कदमांकडे

ठाणे जिल्हा परिषदेची जबाबदारी योगेश कदमांकडे
ठाणे जिल्हा परिषदेची जबाबदारी योगेश कदमांकडे फोटो: ठाणे वैभव
शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे ॲक्टिव्ह मोडवर ठाणे: उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचा राजकीय बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्याकडे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. याच अनुषंगाने ठाणे जिल्हा परिषद निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळख असलेल्या योगेश कदम यांच्याकडे ठाणे आणि पालघर या दोन्ही महत्त्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत झालेल्या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी “संपर्क मंत्री अभियान” राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत राज्यातील २२ जिल्ह्यांसाठी १२ मंत्र्यांवर जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या. यावेळी योगेश कदम यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली. राज्यात फेब्रुवारी महिन्यात काही जिल्हा परिषद निवडणुका पार पडल्या. यामध्ये राज्यात भाजपा एक नंबरचा तर शिंदेची शिवसेना दोन नंबरचा पक्ष ठरली होती. यानंतर सेनेने संपूर्ण राज्यात लगेचच संपर्क अभियान हाती घेतले. ठाणे जिल्हा हा एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासाचा केंद्रबिंदू राहिला आहे. जिल्ह्यात महापालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकीत शिवसेनेची ताकद मोठी असल्याचे दिसून आले असले तरी ठाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही या ताकदीचे मतदानात रूपांतर करण्यासाठी पक्षाने आत्तापासून रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. मंत्री योगेश कदम यांना देण्यात आलेली जबाबदारी केवळ निवडणुकीपुरती मर्यादित नसून संघटन विस्तार, स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय, इच्छुक उमेदवारांची चाचपणी आणि निवडणूक यंत्रणा सज्ज ठेवणे अशा अनेक स्तरांवर काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुका, गाव आणि गण पातळीवर शिवसेनेची पकड अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा ठाणे आणि कल्याण-डोंबिवली पट्ट्यातील प्रभाव लक्षात घेता, आगामी निवडणुकांमध्ये स्थानिक नेतृत्व आणि संघटन यांचा समन्वय साधत मोठी राजकीय मोहीम उभी केली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. योगेश कदम यांची नियुक्ती ही त्याच रणनीतीचा भाग मानली जात आहे. पक्षाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण, ग्रामपंचायत पातळीवरील कार्यकर्ते आणि बूथस्तरावरील संघटन यांची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. मतदार यादी तपासणी, बूथ व्यवस्थापन, प्रशिक्षण शिबिरे, तसेच संपर्क अभियान अशा कार्यक्रमांनाही वेग दिला जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात लक्ष्य निश्चित करून निवडणुकीची काटेकोर तयारी करायची, विजयाची टक्केवारी वाढवायची आणि जिंकण्याची क्षमता असलेले उमेदवार शोधून त्यांना पूर्ण ताकद द्यायची ही पहिली अट आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री आहेत, त्या ठिकाणी जिल्हा व तालुका स्तरावरील शासकीय समित्यांमध्ये शिवसेनेचे प्रतिनिधित्व आक्रमकपणे वाढवायचे, यासाठी स्थानिक खासदार, आमदार आणि संपर्क प्रमुख यांच्याशी थेट समन्वय साधायचा असे स्पष्ट सांगण्यात आले आहे. इतकेच नव्हे, तर ज्या जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार गट) किंवा भाजपचे पालकमंत्री आहेत, तिथेही मागे हटायचे नाही शासकीय समित्यांमध्ये आपल्या पदाधिकाऱ्यांना स्थान मिळवून देण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत दिले आहेत. या अंतर्गत गुलाबराव पाटील यांच्याकडे जळगाव व नंदुरबार, उदय सामंत यांच्याकडे नाशिक व अहमदनगर, योगेश कदम यांच्याकडे ठाणे व पालघर, प्रकाश आबिटकर यांच्याकडे नांदेड व हिंगोली, भरतशेट गोगावले यांच्याकडे बीड, आशिष जयस्वाल यांच्याकडे जालना, प्रताप सरनाईक यांच्याकडे अमरावती व अकोला, संजय राठोड यांच्याकडे यवतमाळ व वाशिम, संजय शिरसाट यांच्याकडे भंडारा व गोंदिया, प्रतापराव जाधव यांच्याकडे नागपूर व वर्धा, शंभुराज देसाई यांच्याकडे गडचिरोली व चंद्रपूर तसेच दादा भुसे यांच्याकडे धुळे व बुलढाणा या जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600