संपादकीय
एक ’प्युअर सिक्वेन्स’ लागतोच!
कोणाला पत्त्यांचा शोक असेल तर आक्षेप असायचे कारण नाही. अर्थात हा शोक विरंगुळ्यापर्यंत मर्यादित राहिला तर उत्तम! त्याचे रुपांतर व्यसनात आणि पुढे जुगारात होणे काही चांगले नाही. तसेच पत्ते कुठे आणि कधी खेळावे याचे तारतम्य बाळगले तर कोणी आक्षेप घेण्याचे कारणही रहात नाही. राज्याचे कृषीमंत्री महादेवराव कोकाटे त्यांच्या रमी खेळण्यामुळे अडचणीत आले आहेत. त्यांचा तो व्यक्तीगत शोक असला तरी तो सार्वजनिक टीकेचा विषय बनला, कारण कोकाटे हे सार्वजनिक व्यक्तीमत्व असून अशा लोकांनी सर्वसामान्य माणसांपेक्षा अधिक निर्बंध पाळायला हवेत. ही चूक त्यांच्या लक्षात एव्हाना आली असेल आणि नकळत का होईना, ती त्यांना भलतीच महाग पडण्याची चिन्हे आहेत.
सार्वजनिक जीवनात कसे वागावे आणि बोलावे यावर पुस्तक असले तरी एकुणातच वाचनाबाबतच्या अनास्थेमुळे त्यातून बोध घेणे आणि योग्य ती सुधारणा करणे या बाबी अशक्यच. त्यातून या क्षेत्रात वावरणाऱ्या मंडळींना आपले कोणी काही वाकडे करु शकणार नाही हा आत्मविश्वास त्यांना गोत्यात आणत असतो. नेत्याचे वर्तन हा सध्या समाजात नकारात्मक चर्चेचा विषय बनला आहे आणि त्यामुळे त्यांची प्रतिमा मलिन होत असते हे अनेक नेत्यांच्या लक्षातच आलेले नाही!
नेतृत्व या शब्दाचा नेता या शब्दाशी संबंध असतो. जो समाजाचे नेतृत्व करतो. अर्थात पुढे नेतो तो नेता. मूळ धातू 'ने' मानला तर चांगले न वागणारे नेते आपल्याला कुठे नेतील याचा विचार करावा लागेल. सध्या बहुतांशी नेत्यांचे वर्तन पहाता सारा समाज खाईत लोटण्याची कोणतीही कसर न सोडण्याचाच जणु चंग बांधलेला दिसतो. आपले जवळचे कार्यकर्ते डोळ्यांदेखत गुंडगिरी करतात आणि नेते त्याकडे कानाडोळा करीत असतील तर यांना नेते कसे मानायचे? अत्यंत अश्लाघ्य भाषेत विरोधकांवर टीका करणाऱ्यांकडून सुसंस्कृतपणाची अपेक्षा कशी बाळगायची? त्यांना ’नेते’ कसे मानायचे? उत्पन्नाचे कायदेशीर मार्ग नसणारे नैतिकतेवर कसे बोलतील? आणि मग त्यांना नेते म्हणून कसे स्वीकारायचे? असे अनेक प्रश्न इतके दिवस जनतेच्या मनात होतेच ते आता राजकारणात येऊ इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मनात येऊ लागले आहेत.
राजकारणात स्वच्छ प्रतिमेचे नीतीमत्ता असलेले आणि नैतिकतेला प्राधान्य देणारे यांचे कामच नाही असे एकूण चित्र आता गडद झाले आहे. ते पुसण्याचे प्रयत्न होताना दिसत नाही. उलटपक्षी हे चित्र गिरवण्याचे धडे दिले जात आहेत. या प्रक्रियेत गुंतलेले नेते काय दिशा दाखवणार, कोणते मार्गदर्शन करणार आणि समाजाल कुठे ’ने’ णार या प्रश्नाभोवती महाराष्ट्रातील राजकारण फिरत आहे.
महापालिका निवडणुका आता येत्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. इच्छुक उमेदवार नेत्यांच्या नजरेत भरण्यासाठी हालचाल करु लागले आहेत. शहराच्या सुशोभीकरणावर पुढे जाऊन सभागृहात बोलणारे भावी नगरसेवक शहर-विद्रुपीकरणात गुंतताना दिसत आहेत. जांभळी नाका घ्या की मीनाताई ठाकरे चौक घ्या, फलकबाजीमुळे हे चौक झाकले गेले आहेत. या भावी नेत्यांना आवर कोण आणि कसा घालणार? त्यांचे नेतेच या विद्रुपीकरणात अग्रेसर आहेत. तरी त्यांना ’ने’ ते म्हणायचे?
जे बिघडले त्यांच्याबद्दल बोलण्यात अर्थ नाही. त्यांना मतदारांनी एकदा नाही अनेकदा संधी दिली. आपण शहराच्या भवितव्याबद्दल खरोखरीच गंभीर असू तर सध्या होर्डिंग्जवरुन राजकारणात चंचूप्रवेश करणाऱ्या उगवत्या नेत्यांकडून काही अपेक्षा नक्कीच बाळगाव्या लागतील. मुळात वाढदिवसानिमित्त होर्डिंग्ज लावण्याची अत्यंत सवंग आणि चुकीची प्रथा या मंडळींनी अंगीकारता कामा नये. त्याऐवजी प्रभागात एखादा उत्तम सामाजिक उपक्रम राबवून आपल्यातील ’ने’ ते पणाची त्यांनी झलक द्यायला हवी. होर्डिंगवरील फोटो काही दिवसांत विस्मरणात जातात, पण चांगले काम सहजासहजी पुसले जात नसते. अशा कामातून निर्माण होणारी ऊर्जा, सकारात्मक दृष्टीकोन आणि सामाजिक बांधिलकीचे भान, अशा सर्वच गोष्टी जपायला हव्यात. प्रचलित राजकारणात त्या हद्दपार झालेल्या दिसतात. अशा राजकारणाचा समाजाला विट आला आहे, हे ओळखून उद्याच्या नेतृत्वाने आपले ’ने’ ते पण जीवंत ठेवायला हवे.
विषय ’रमी’ वरुन सुरु झाल्यामुळे एक गोष्ट सांगावीशी वाटते. कोणतीही रमी ’प्युअर सिक्वेनस’ असल्याशिवाय ग्राह्य धरली जात नाही. जनतेला अशा शुद्ध ’ने’त्यांची गरज आहे! जोवर, सिक्वेन्समध्ये एखादा चालू शकतो. पण सारेच जोकर एकत्र आले तर, हसू व्हायचे! ’रमी’ प्रकरणातून हा बोध घेतला गेला तरी खूप होईल!
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600